Book Review - प्रकाशवाटा डॉ. प्रकाश आमटे


गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील माडिया गोंड आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी, आरोग्याच्या प्राथमिक सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना स्वयंपूर्ण स्वतंत्र बनवण्यासाठी आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणून जगायची संधी मिळवून देण्यासाठी डॉ. प्रकाश आमटेंनी त्यांच्या साथीदारांसोबत केलेल्या प्रयत्नांचं एक प्रवासवर्णनच या पुस्तकातून लिहिलं आहे, असं मी म्हणेल. या पुस्तकामुळे मला अजून एक प्रेरणादायी जीवनप्रवास वाचायला मिळाला.

माडिया गोंड ही आदिवासी जमात खूपच मागासलेली आहे. त्यांना लिहिता-वाचता येत नसे, कपडे घालायची सवय नसे, दुसरी भाषा येत नसे. पण एवढ्यापुरतंच यांचं मागासलेपण मर्यादित न्हवत तर आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं कमालीचं अज्ञान आणि अफाट दारिद्र्य होतं. गरिबीमुळे दोन वेळच्या खाण्याची मारामार त्यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे अन्न मिळवायच्या तजविजीत असतं. आणि खाणं काय, तर कंदमुळ, आंबील, भात आणि मिळतील ते प्राणी. अगदी मुंग्यांची चटणीसुद्धा. कारण यापलीकडे दुसरे काही पर्याय असतात याची जाणीवच त्यांना नव्हती. त्यामुळे कुपोषण प्रचंड.

डॉक्टर आणि त्यांचे सहकारी आपलं शिक्षण, आपल्या नोकऱ्या, शहरातील आपलं सुखकर आयुष्य सोडून गडचिरोलीच्या हेमलकसा भागात आले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करत राहिले आणि अगदी मनापासून इथेच रमले. माडियांमुळे त्यांची जीवनशैली बदलून गेली. कसोटीचे, धीर खचवणारे प्रसंग खूपदा आले; पण त्यामुळेच इथे कामाची किती गरज आहे, हेही त्यांना नव्याने कळत गेलं. पाय मागे घ्यायचा नाही, हे डोक्यात पक्क होतं. त्यामुळे त्यातूनही सगळे एकमेकांच्या मदतीने मार्ग काढत गेले. टिकून राहिले. काम वाढवत गेले.

या दुर्गम भागात दुभाष्या नसल्याने आलेल्या आदिवासी पेशंटशी संवाद करायला त्यांना त्रास व्हायचा. भाषा शिकण्यासाठी त्यांनी मग पेशंटचीच मदत घेतली. त्याला खाणाखुणांनी विचारायचं, 'तुला काय झालंय?' मग तो आधी खुणांनी सांगणार आणि मग त्याच्या भाषेत बोलायचाही 'पोट दुखतंय, साप चावला, अस्वलानं मारलं' वगैरे. मग ते शब्द त्यांनी लिहून ठेवले. त्यांचे अर्थही मराठीत लिहिले. यातून ते व्यवहारातले बरेच शब्द शिकले. अशाप्रकारे ते ही भाषा बोलायला लागले. मग कधी कधी गावात जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न करू लागले.

माडिया गोंड आदिवासी लोकं स्वतःच्या कोषात इतके अडकलेले, की बाहेरचा वाराही त्यांना सहन न होणारा. त्यांना त्याची सवयच नव्हती. गरिबीमुळे शिक्षण घ्यायला वेळ नाही आणि शिक्षण नाही म्हणून गरिबी हटत नाही, असं हे दुष्टचक्र सतत त्यांच्या आयुष्यात सुरू आहे. गरिबी आणि अशिक्षितपणा यांचं दुष्टचक्र जसं आदिवासींना घेरून होतं, तसंच अंधश्रद्धेचं गारुडही त्यांच्यावर होतं. डॉक्टरांच्या सहकाऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे खूप प्रयत्न केले. परंतू , "बदल हे घाईने होत नसतात. वर्षानुवर्षं माणसं जे करत आली आहेत ते आपण जाऊ आणि बदलू, असं होत नसतं. हे बदल हवेत, असं त्यांना स्वतःला ठरवू दे. मग ते हळूहळू बदलतील. त्यासाठी आधी त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण व्हायला हवा. त्यांचं प्रबोधन करण्याऐवजी त्यांना पर्याय देऊ या आणि आशा करू या, की ते योग्य तो पर्याय निवडतील.", असं त्यांच्यातील अंधश्रद्धा लगेच हटवण्याबाबत डॉक्टर म्हणतात.

त्यांच्या अंधश्रद्धेचा, आणि अज्ञानाचा फायदा डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून बऱ्याचदा घेतला जातो. आदिवासींमध्ये काम करणाऱ्या, त्यांच्याविषयी विचार करत असल्याचं दाखवणाऱ्या याच लोकांचं मात्र वेगळंच मत असतं. आदिवासी आपल्या जगात सुखात आहेत; त्यांना शिक्षण देऊन त्यांची संस्कृती बिघडवण्याची गरज नाही, असं त्यांच्यापैकी काहींचं म्हणणं असतं. पण, "अज्ञानात माणूस 'सुखी' असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याच्यापुढच्या पर्यायांच्या वाटा आपण बंद करत असतो. त्यामुळेच संस्कृती टिकवण्याच्या नावाखाली अज्ञानाचं समर्थन करणं कितपत योग्य आहे? त्यापेक्षा त्यांना शिक्षण घेऊ द्या आणि स्वतःला ठरवू द्या त्यांना कसं जगायचं आहे ते.", असं डॉक्टरांचं म्हणणं.

बाहेरून आलेले सगळेजण- अगदी तलाठ्यांपासून सगळे- त्यांचं शोषण करीत असत. अगदी आजदेखील अशा गोष्टी घडत असतात, काही दिवसापूर्वीच एक बातमी ऐकली की खावटी अनुदान योजनेची मदत अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. हे थांबवायचं तर त्यांच्यातीलच माणसं या जागांवर हवीत. आणि हे करायचं तर शिक्षणाशिवाय कसं जमणार? अज्ञानाचं हे दुष्टचक्र आपण शिक्षणानेच भेटू शकतो. त्यावर उपाय काय, याचा विचार करत असताना डॉक्टरांना जाणवलं, की आदिवासींच्या मुलांना लिहायला, वाचायला शिकवलं तर ते आपल्या हक्कांसाठी लढायला शिकतील. म्हणून त्यांनी निवासी शाळा सुरू केली. औपचारिक शिक्षण दिलं तरच मुलं परीक्षा देऊ शकणार, आणि परीक्षा दिल्या तरच त्यांना जगाचे दरवाजे खुले होणार. त्यामुळे मुलांच्या कौशल्याचा विचार करून औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाची सांगड घातली.

डॉक्टरांनी पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आणि बहुदा आपल्या सर्वांच्याही अनुभवावरून हे लख्खपणे दिसत राहतं की सरकारची मदत, योजनांचा फायदा गरिबांपर्यंत, आदिवासींपर्यंत पोहोचतच नाही. सरकारच्या बऱ्याच योजनांचं असं होतं की ज्यांच्यासाठी त्या योजना सुरू केल्या जातात त्यांना एक तर त्या योजनांची माहिती मिळत नाही किंवा ज्यांच्यापर्यंत ती मदत पोचते ती अगदीच अपुरी असते कारण मधल्याच लोकांनी ती बऱ्याचदा बळकावलेली असते.

डॉक्टरांनी हाताळलेल्या वेगवेगळ्या केसेस हृदय पिळवटून टाकणाऱ्या आणि हादरून सोडणाऱ्या आहेत, त्या वाचल्या की मन थांबून जातं. एकदा एका दहा वर्षांच्या मुलीच्या पोटात बांबूची काडी गेलेली. त्या काडीमुळे पोटाला छिद्र पडलं आणि तिचं आतडंच बाहेर आलं. ती मुलगीही अशी बहाद्दर, तिनं आईवडिलांना सोबत घेतलं आणि ते बाहेर आलेलं आतडं हातात धरून पंधरा किलोमीटर चालत आली! दवाखान्यात येईपर्यंत बराच वेळ झाल्याने बाहेर आलेलं ते आतडं फुगलं होतं. हे आतडं पुन्हा आत ढकलणं, हा एकमेव उपाय डॉक्टरां समोर होता. त्यामुळे त्यांनी ते दाबून थोडंसं बारीक केलं आणि पोटाच्या ज्या छिद्रातून ते बाहेर आलं होतं. त्यातूनच आत ढकलायचा प्रयत्न सुरू केला. तिला प्रचंड दुखत असणार; पण ती मुलगी इतकी सहनशील की थोडंसं ओरडण्यापलीकडे तिने काही त्रास दिला नाही. बऱ्याच वेळाच्या प्रयत्नांनी आतडं पुन्हा आत गेलं. हे सर्व करत असताना मुलगी पूर्ण शुद्धीवर होती. मग टाके घालून पोट शिवून टाकलं. काहीही त्रास न होता ती मुलगी खडखडीत बरी होऊन घरी गेली.

एकदा एका अडलेल्या बाईला १०-१२ माणसं घेऊन आलेले. मूल आडवं होऊन त्याचा हात बाहेर आलेला. नैसर्गिकरीत्या प्रसूती शक्य न्हवती. चंद्रपूरला गेलं तरच शस्त्रक्रिया करता येणार होती पण पावसाळ्याचे दिवस त्यामुळे रस्ते बंद झालेले. त्या परिस्थितीत मूल आणि आई दोघंही वाचणं कठीणच होतं. मुलाला बाहेर काढलं तर आई वाचू शकणार होती. डॉक्टरांनी असं ऑपरेशनही केलेलं नव्हतं आणि बघितलंही नव्हतं. पण शेवटी छातीवर दगड ठेवून त्यांनी ऑपरेशन केलं. मुलाला कापून बाहेर काढावं लागलं. ऑपरेशनमुळे आईचा जीव वाचला होता. पण मूल गेल्याचं त्या लोकांना, अगदी त्या बाईलाही फारसं काही वाटलं नाही. आईचा जीव वाचला ना, मग होतील तिला मुलं, असा त्यांचा सरळसोट, थेट विचार होता. शिवाय तिथे बालमृत्यूचं प्रमाण एवढं होतं, की कुपोषण, आजार, सर्पदंश यामुळे पहिल्या वर्षात खूप मुलं मृत्युमुखी पडत. हे मूल थोडं आधी गेलं एवढंच, असं त्यांना वाटलं असावं.

या समाजात प्रत्येकजण अगदी लहान मुलंही आपलं खाणं स्वतः मिळवतात. एकजण मिळवून आणणार, बाकी खाणार, हा प्रकार इथे नाही. मग कष्ट करणाऱ्यालाच जर पुरेसे अन्न मिळत नाही तर नुसत बसून राहणाऱ्याला कोण काय देणार? त्यांच्या भोवतीच्या कठीण परिस्थितीतूनच त्यांचं जगणं आकाराला येत असल्यामुळे आपल्याला अमानुष वाटणाऱ्या घटना ते सहज पचवतात.

डॉक्टरांना आलेले अनुभव आणि त्यांनी हाताळलेल्या मेडिकल केसेस वाचल्यावर लक्षात येतं की स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर देखील आपल्या देशात बरेचसे भाग असे आहेत की तिथे basic आरोग्य सुविधा देखील पोहोचल्या नाहीत. सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे तर ते स्पष्टच झाले आहे की कोरोनामुळे नव्याने उद्भवलेल्या या आरोग्य विषयक आणीबाणीला तोंड द्यायला आरोग्य यंत्रणा शहरात देखील कमी पडते आहे.

हेमलकशाच्या प्रकल्पावर डॉक्टरांनी आरोग्य, शिक्षण, शेती अशा विविध विषयांत अनेक प्रयोग केले. ते सर्वत्र वाखाणलेही गेले. परंतु 'हिंस्र' समजल्या जाणाऱ्या जंगली प्राण्यांसोबत जे सहजीवनाचे प्रयोग त्यांनी केले ते मला विशेष महत्त्वाचे वाटतात. मुळात आपण हे समजून घेतलं पाहिजे कोणताही प्राणी आपणहून मानवावर कधीच हल्ला करत नाही, त्याला धोका वाटला किंवा त्याला त्रास दिल्यासच ते हल्ला करतात. डॉक्टर म्हणतात, "खरं तर सगळ्यात बेभरवशाचा प्राणी असतो तो माणूस; पण तो इतरांना, विशेषतः प्राण्यांना किती सहजासहजी दूषणं देतो! प्राण्यांना उत्तरं देता येत नाहीत म्हणून, नाही तर त्यांनीही माणसाच्या विश्वासघाताचे किती तरी पुरावे सादर केले असते!".

हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येतं की किती अवघड परिस्थितीत डॉक्टरांनी हे अफाट काम केलं आहे. त्यांच्या कामाचा पसारा आणि त्यांची रुग्णसेवेसाठीची धडपड, तळमळ लक्षात येते. डॉक्टर असलेल्या या अवलियाने गडचिरोलीतील आदिवासी लोकांच्या आयुष्यात कशाप्रकारे उज्ज्वल भविष्याचा प्रकाश आणला, हे नक्की वाचा.

या पुस्तकातून शिकण्यासारखं खूप काही आहे पण, "सगळ्याच गोष्टी दुसऱ्यांच्या दृष्टीतून पाहायच्या नसतात. आपल्या पद्धतीचं आयुष्य जगताना आपले अनुभवही आपणच घ्यायचे असतात. त्याच्या बऱ्यावाईट परिणामांची जबाबदारीही स्वतःच घ्यायची असते. आणि हे सगळं तक्रार न करता सहज स्वीकारलं तर मिळणारं समाधान वेगळंच असतं" असा एक छानसा संदेश मला या पुस्तकातून मिळाला.

Comments