"पंच्याहत्तरीतला भारत..."

"पंच्याहत्तरीतला भारत..."
१५ ऑगस्ट २०२१

सर्वात प्रथम देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🏻


एक मोठा पल्ला देशाने पार केला आहे. आपण आपला ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना, आपण जे साध्य केले नाही त्याबद्दल केवळ रागाने मागे वळून पाहू नये, तर आपल्याकडे काय आहे यावरही आश्चर्य व्यक्त केले पाहिजे. साडेसात दशके हा एक दीर्घ कालावधी आहे, जरी तो राष्ट्रांच्या इतिहासातील क्षणभंगुर क्षण आहे. तेव्हा जग वेगळे होते. तेव्हा भारत वेगळा होता. भारतीय अर्थव्यवस्था तेव्हा वेगळी होती.

जर आपण सामाजिक-आर्थिक निर्देशकांच्या दृष्टीने पाहणार असू, तर १९४७ मध्ये सरासरी भारतीय असणे कसे होते हे आपल्याला सांगता येणार नाही कारण १९५०-५१ च्या अर्थसंकल्पीय कागदपत्रांमध्ये समाविष्ट केलेला पहिला "White Paper"(Economic Survey) वाचला तर आज असलेल्या मानवी विकास निर्देशकांसारखे असे काहीही त्यात मिळत नाही.

पण अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी भारताचे वार्षिक दरडोई उत्पन्न २७४ होते जे आता १.३५ लाख आहे. लोकसंख्येची घनता (प्रति चौरस किलोमीटर) १९४७ साली ११४ होती ती आता ४१० वर पोहोचली आहे. प्रजनन दर ५.९ होता तो आता २.२ आहे. नागरिकांचं सरासरी आयुर्मान ३७ वर्षावरून ६९ वर्षांवर पोहोचलं आहे. शहरी लोकसंख्येचं प्रमाण १७% वरून ३५% वर पोहोचलं. त्याकाळी लोकसंख्येच्या मानाने सगळ्यात मोठं शहर असलेल्या कोलकाता(४६ लाख) शहराला मागे टाकत दिल्ली(३.०३ कोटी) सगळ्यात मोठं शहर बनलं. विजेचा दरडोई वापर जो त्याकाळी दर तासाला १६ किलोवॅट होतो तो वाढून ११८१ किलोवॅट वर पोहोचला.

स्त्री-पुरुष साक्षरता दर १८.३३% होता तर महिलांचा ८.८६% जो आपण आता स्त्री-पुरुषांसाठी ७४.०४% तर स्त्रियांसाठी ६५.४६% गाठला आहे. लिंग गुणोत्तराच्या बाबतीत मात्र आपण कमी पडलो आहोत, १९५१ मध्ये ९४६ असलेला लिंग गुणोत्तर दर ९४३ पर्यंत घसरला आहे. स्त्रियांचा शिक्षणातील सहभाग वाढल्यामुळे त्या आता वेगवेगळ्या क्षेत्रात मोठमोठ्या पदावर काम करत आहेत. संरक्षण क्षेत्रातही त्या पुरुष सहकाऱ्यांसोबत देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर उभ्या आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि वेगवेगळ्या महत्वाच्या खात्यावर त्यांची वर्णी लागली आहे. युवा स्त्री खेळाडूंनी देशाला वेगवेगळ्या खेळात जागतिक पातळीवर पदकं जिंकवून देऊन देशाच्या नागरिकांची मान अभिमानाने उंचावली आहे.
परंतू शिक्षणावर एकूण GDPच्या ७-८% खर्च करणे गरजेचं असताना आपण त्याच्या ५०%हूनही कमी खर्च करत आहोत. शिक्षणावरील एकूण खर्चाच्या बाबतीतही भारताचा जगात ८०वा क्रमांक लागतो.

गेल्या ७५वर्षात देशाने अनेक चढउतार, राजकीय स्थिस्त्यंतरं, अनेक दहशतवादी हल्ले पाहिली, परकीय आक्रमणे परतवून लावली. पाकिस्तानसोबत ४ आणि चीनसोबत १ युद्धे झाली. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांकरवी केलेल्या हल्ल्यांना सडेतोड उत्तरे दिली प्रसंगी पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी लाँचपॅडवर Airstrike केली.

१९६६-६७ ते १९८०-८१ काळात एम.एस.स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू करून भारतात हरित क्रांती घडवून आणली गेली. ज्यामुळे गहू, बाजरी, भात, मका आणि ज्वारीच्या उत्पादनात अभूतपूर्व वाढ झाली. परिणामी भारत अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला. हरित क्रांतीचा परिणाम म्हणून पारंपारिक शेतीमध्ये बदल झाला आहे आणि शेती व्यावसायिक दृष्टिकोनातून सुरू झाली आहे. देशात ऊस, कापूस, ताग आणि तेलबियांचे उत्पादन वाढले आहे.

देशाने १९७५ ते १९७७ दरम्यान २१ महिन्यांची वाईट आणीबाणी अनुभवली. ज्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. रा.स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली.

१९७० पासून ऑपरेशन फ्लड(Operation Flood) अंतर्गत भारतभरातील दूध उत्पादकांना ७००हून अधिक गावं आणि शहरांतील ग्राहकांशी जोडणारे राष्ट्रीय दुध ग्रिड तयार केले. ज्यामुळे हंगामी आणि प्रादेशिक किंमतीतील फरक कमी झाला आणि मध्यस्थांना काढून टाकून उत्पादकांना नफ्यात मोठा वाटा मिळतो हे सुनिश्चित केले. या कार्यक्रमामुळे "श्वेत क्रांती" घडवून आणली.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुरुवातीला भारताची आर्थिक धोरणे स्वदेशी उद्योगांना सरकारकडून संरक्षण यासारख्या (Protectionism) समाजवादी कल्पनांवर आधारित होती. परंतू १९९१ साली भारताचा व्यापारातील मोठा भागीदार असलेल्या सोविएट युनियनच्या अस्तामुळे आणि आखाती युद्धामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे भारतापुढे आयात-निर्यातीच्या समतोलाचा (Balance of payments) मोठा प्रश्न निर्माण झाला ज्यामुळे बाह्य देशांकडून घेतलेले कर्ज भारत वेळेवर परत फेडू शकेल की नाही अशी शंका उत्पन्न झाली. त्यामुळे भारताला आर्थिक उदारीकरणास सुरुवात करून जगासाठी आपली बाजारपेठ खुली कारवाई लागली.

आपण अवकाश क्षेत्रातसुद्धा एक अशी उच्च पातळी गाठली आहे कि जगातील देश विश्वासाने त्यांची उपग्रह आपल्या इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपण यानाने अवकाशात पाठवतात. देशाने केलेल्या दोन आण्विक चाचण्यांमधून आपल्या आण्विक शक्तीची अनुभूती जगाला करून दिली पण सोबतच जगाला ठणकावून देखील सांगितले कि भारत आण्विक शस्त्रांबाबत नो-फर्स्ट-यूज धोरण अवलंबेल आणि भारताची अण्वस्त्रे ही केवळ प्रतिबंधक आहेत आणि भारत "केवळ प्रतिशोध"(retaliation only) चे धोरण अवलंबेल.

जपान, सिंगापूरसारखी देशं जी आपल्या सोबतच मोठी झाली, त्यांच्या प्रगतीसोबत आपण तुलना केली तर आपण मागे असू पण येणारे भविष्य हे आपल्याच हाती आहे. गेल्या ७४ वर्षात अनेक आव्हाने पार करत आपल्या देशाने जगात एक बळकट स्थान निर्माण केले आहे. अजूनही आपल्याला बऱ्याच गोष्टी साध्य करायच्या आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर, आपल्याकडे असलेली तरुण शक्ती वापरून आणि सामाजिक भागीदारीतून आपण १३० कोटी भारतीय नक्की ते घडवू शकतो असा माझा विश्वास आहे.

Comments

Post a Comment