दुर्गराज दुर्गदुर्गेश रायगड (Raigad Fort)

दुर्गराज रायगड
२२ आणि २३ जून २०१९


हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि प्रत्येकाच्या मनातलं मानच स्थान असलेला रायगड किल्ला. आपला मान, स्वाभिमान आणि अभिमानाचा प्रतिक म्हणजे रायगड. अफाट असा रायगड....
युरोपिअन ह्या किल्ल्याला पूर्वेचा जिब्राल्टर असे संबोधतात. कारण जिब्राल्टर जितका अजिंक्य तितकाच रायगडही. दुर्गदुर्गेश्वराला विविध अशा १५ नावांनी संबोधिले आहे. १. रायगड, २. रायरी, ३. इस्लामगड, ४. नंदादीप, ५. जंबुद्विप, ६. तणस, ७. राशिवटा, ८. बदेनूर, ९. रायगिरी, ११. भिवगड, १२ रेड्डी, १३. शिवलंका, १४. राहीर, १५. पूर्वेकडील जिब्राल्टर


महाराष्ट्रात राहणार्‍या प्रत्येक माणसाची एकदा तरी रायगड किल्ला पाहाण्याची इच्छा असते. आता रोप-वेमुळे रायगड किल्ला लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या आवाक्यात आलेला आहे. आमचा किल्ले रायगडचा ट्रेक अनेक अंगांनी आठवणीत राहतो. त्यावेळी या ट्रेकची खरेतर अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो. रायगड पहायची, तिथे रात्र काढायची, तिथे घडलेल्या अनेक महत्वपूर्ण घटनांची साक्ष देणाऱ्या वास्तूंसमोर त्या घटना डोळ्यासमोर उभ्या करण्याची आणि महाराजांच्या समाधीपुढं नतमस्तक होण्याची प्रचंड इच्छा होती. या ट्रेकचा plan एप्रिल महिन्यापासूनच सगळ्यांच्या मनात सुरु झालेला. सगळी जमवाजमव करून, लोकं गोळा करून एकदाची मोहीम ठरली आणि २२ जूनला आम्ही सगळे रायगडाकडे मार्गस्थ झालो.

Team बरीचशी तीच होती फक्त अजून काही नवे partners आता join झालेले. AMKला सोबत असलेला माझा बालमित्र आदित्य बोरुडे, रिषभ म्हात्रे, राहुल बनकर, कुणाल खोडके आणि दिवेश अर्जुने, तन्मय श्रीरामजवार हे नेहमीचे मित्र होते. अदिती कुलकर्णी, जी रिषभची colleague होती ती, आणि तिचे आई आणि वडील यावेळी नवीन होते. माझी लहान बहिण आकांक्षा आणि लहान भाऊ युगंधर हेसुद्धा नवीनच होते. आणि सोबतच स्वराज, स्वराजचे आई आणि वडीलपण आलेले. त्यामुळे हा trek तसा एका family trip सारखाच होता.

दिवस पहिला:
चांदणी चौकात ७:०० पर्यंत सगळ्यांनी जमायचं होतं. ठरलेल्या वेळेप्रमाणे मी, आकांक्षा आणि युगंधर आणि काही मंडळी चांदणी चौकात पोहोचलेलो पण प्रत्येक group मध्ये असतात त्याप्रमाणे आमच्या group मधील आळशी असलेले काही members आलेच न्हवते. त्यांची वाट पाहत मग चांदणी चौकाच्या pmt bus stop वर ताटकळत उभं राहावं लागलं. त्यांच्यामुळे सगळे जमायला आठ वाजले. आता सोबत १ कार आणि ५ मोटरसायकल्स आणि १५ मंडळी असा लवाजमा होता. इतक्या लोकांना सोबत घेऊन एवढ्या दूर जाण्याचा हा आमचा पहिलाच ट्रेक त्यामुळे काहीसा धाडसी म्हणावा असा. ठरल्याप्रमाणे जाताना पिरंगुटला श्रीपादच्या मिसळपाववर ताव मारला आणि सव्वा नऊला सगळ्यांनी रायगडाकडे प्रस्थान केलं.

श्रीपादला मिसळ खाल्ल्यानंतर
श्रीपादला मिसळ खाल्ल्यानंतर

मुळशी dam पर्यंत बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं काम चालू होतं आणि पिरंगुटच्या पुढे एका मोटारसायकलच पंक्चर निघालं. सगळे जण आपापल्या Speed ने जात होते. KTM जरा जास्तच fast चाललेली आणि splender हळूहळू का असेना पण आरामात चाललेली. मुळशी dam च्या अलीकडे उजव्या हाताच्या एका छोट्याश्या स्टॉलवरचा वडापाव (अविनाश हरगणे वडापाव सेंटर) मला आवडलेला. तो जेवढे मित्रसोबत होते त्यांना खाऊ घालून सगळ्यांची बॅटरी चार्ज केली आणि पुन्हा निघालो.

मुळशीत पावसाळा म्हणावा तसा सुरू झालेला न्हवता, १-२ वेळा पाऊस होऊन गेलेला. पण तरीही सगळा निसर्गाने हिरवाई पांघरली होती. पण या वेळेचा अजून एक फायदा असा होता की ताम्हिणी घाटातील रानमेवा अजून मिळू शकत होता. आमच्या नजरेतून अश्या गोष्टी सहसा सहजासहजी निसटत नाही. पोरं नजर ठेऊनच होते. ताम्हिणी गावाच्या पुढे गेलं की त्यांना एक जांभळाचं झाड दिसलं आणि सगळ्यांच्या गाड्यांना ब्रेक लागला. पोरांनी झाडावर चढून जांभळं काढली, जांभळाच्या फांद्या आतून पोकळ असतात त्यामुळे थोड्याशा वजनाने त्या तुटतात पण देव कृपेने कोणती फांदी तुटली नाही आणि कोणी पडलं सुद्धा नाही. पोटभरून जांभळं खाल्ली आणि काही पिशवीत भरून घेतली. आमचं पाहून अजून काही लोकांनी त्यांच्या गाड्या थांबवल्या. तिथून काहीएक किलोमीटर गेलं की ताम्हिणी घाट सुरु होतो अगदी तिथेच बऱ्याचश्या करवंदाच्या जाळ्या सुरू होतात आणि त्या रस्त्याला एकदम लागून आहेत. इतर ठिकाणी या करवंदाच्या जाळ्या जंगलात किंवा डोंगरावर असतात. इथेपण मग गाड्या थांबल्या आणि करवंद गोळा करायला सर्व जण तुटून पडले. भरपूर करवंद गोळा केली आणि खाल्ली. अशाप्रकारे मजामस्ती, रानमेवा खात आमच्या ट्रेकची सुरुवात झाली.

झाडावर चढून खाल्लेले जांभळं कमी म्हणून की काय राहुल ने फांदीच तोडून घेतली
झाडावर चढून खाल्लेले जांभळं कमी म्हणून की काय राहुल ने फांदीच तोडून घेतली

Vile-Bhagad MIDC पार केल्यानंतर एका छोट्याश्या टेकडीवजा घाटात वळणावर आमच्यातील एका बहाद्दराची गाडी ताबा सुटल्याने रस्ता सोडून बाहेर रस्त्याच्या खाली उतरली. पाणी जिरवण्यासाठी खोदलेल्या खड्ड्याच्या मातीच्या ढिगाऱ्याला जाऊन आदळल्यामुळे एका मोठ्या अपघातातून आम्ही वाचलो. दोघांना हातापायाला खरचटलं होतं पण गाडीच नुकसान झालेलं. गाडी दुरुस्त करणं गरजेचं होतं, शेवटी त्या गाडीवरच्या मित्रांना कार मध्ये बसवलं आणि एकजण ती गाडी चालवत निजामपूरपर्यंत घेऊन गेला. निजामपूरला गाडी दुरुस्तीला टाकली आणि काही लोकं रात्रीच्या जेवणासाठी कांदा, बटाटे असा भाजीपाला घ्यायला गेले. गाडी दुरुस्त करायला १ तास तरी गेला त्यामुळे सगळं आवरून निजामपूरवरून निघायला आम्हाला दिड वाजले. सुरुवातीपासूनच कमी अधिक प्रमाणात विघ्न येतच होती. ठरलेल्या वेळेपेक्षा उशीरही झाला होता. प्लॅननुसार बारा वाजेपर्यंत रायगडाच्या पायथ्याशी आणि १२:३० वाजता रायगड चढायला सुरू करणं अपेक्षित होतं. पण ठरलेल्या वेळेच्या निदान अडीच तास आम्ही मागे होतो.


मग रायगडाच्या आशेने सगळ्यांनीच गाड्या पळवायला सुरुवात केली. मी आणि दिवेश मागे पडलो होतो. पाचाडच्या अलीकडे माझी नजर एका आंब्याच्या झाडावर गेली, झाडाला काही पिकलेल्या कैऱ्या शिल्लक होत्या. घाबरत घाबरतच दिवेश झाडावर चढला आणि हाताला येतील तेवढ्या कैऱ्या काढल्या आणि १-२ दगड मारून पाडल्या. सगळी लोकं आमची पाचाडला राजमाता जिजाबाईंच्या समाधीजवळ वाट पाहत बसले होते म्हणून पटकन
सगळ्या कैऱ्या बॅगेत भरून आम्ही तिकडे निघालो. समाधीचं दर्शन घेतलं आणि पुन्हा एकदा गाड्या रायगडाकडे निघाल्या. जिजाऊ समाधी स्थळापासून रायगड फारसा दूर नाहीये ५-१० मिनिटात गडाच्या पायथ्याशी पोहचलो. गाड्या पार्क केल्या आणि फ्रेश होऊन एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो. आम्ही बऱ्याच लोकांनी दुपारचं जेवण घरूनच आणलं होतं आणि रात्रीसाठी चपात्या आणलेल्या. बाकीच्यांसाठी विकत घेतलं. पोटपूजा उरकून रायगड चढायला ताजेतवाने झालो. आता आज गडावर गेलो की उद्याच खाली येणार होतो त्यामुळे लागणाऱ्या सगळ्या गोष्टीसोबत आहेत याची खातरजमा केली. अदितीचे आई वडील ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे रायगड चढू शकत न्हवते. ते आणि सोबत स्वराजची आई, रिषभ, कुणाल रोप-वेने आधी वर गेले. बाकीचे आम्ही सगळे रायगड चढून जाणार होतो. शिवगर्जना करत चित्‌ दरवाज्यापासून (जो आता अस्तित्वात नाही पण तिथून पायऱ्यांची सुरू होते) ट्रेकची सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच दिसणारा टकमक टोकाचा कडा जितका मन आकर्षून घेत होता तितकाच मनात धडकीसुद्धा भरवत होता. तन्मय थोडं चालला की थकत होता म्हणून मी त्याच्यासोबत येत होतो बाकी सगळे पुढे निघून गेले होते. रायगडाची भव्यता अनुभवत, आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य न्याहाळत महादरवाजापर्यंत (जवळजवळ १५०० पायर्‍या चढून गेल्यावर महादरवाजातून आपला गडात प्रवेश होतो) पोहोचलो. आजपर्यंत फक्त ऐकून होतो रायगडा च्या भव्यतेबद्दल, आज प्रत्यक्षात पाहत होतो.

गड चढायला सुरुवात करताना डाव्या बाजूस दिसणारे टकमक टोक
गड चढायला सुरुवात करताना डाव्या बाजूस दिसणारे टकमक टोक

गडाचा महादरवाजा
गडाचा महादरवाजा

महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणार्‍या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ’श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ’श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ’विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज आहेत, एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. या बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या आहेत. महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर हत्ती तलाव दिसतो. गजशाळेतून येणाऱ्या हत्तीच्या स्नानासाठी आनि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत असे. हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेची इमारत आहे. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५०-६० पावले चालत गेल्यास गंगासागर तलाव लागतो. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली होती. म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले.
आम्हा दोघांना गडाच्या माथ्यावर पोहोचेपर्यंत सव्वा सहा झालेले. बाकीचे सगळे आधीच गडावर पोहोचले होते. काही होळीच्या माळावर महाराजांच्या मूर्तीचे फोटो काढत होते तर काही सूर्यास्ताची तर काही नगारखाना, राजदरबाराची तर काही मुक्कामाच्या जागी गेलेले. महाराजांची राज्यभिषेकाची जागा पाहिली, मेघडंबरीतील महाराजांचा सिहांसनरूढी पुतळा पाहून छत्रपती शिवाजी महाराज की...जय..! ही घोषणा देताना अंगात प्रचंड जोश संचारला. तिथून पुढे जाऊन पालखी दरवाज्यामार्गे महाराष्ट्र पर्यटन मंडळाच्या रिसॉर्टवर पोहचलो. इथे आम्ही आधीच १० लोकांच्या राहण्यासाठी dormitory बुक केलेली आणि बाकीची ५ बाहेर tentमध्ये झोपणार असा plan होता. गेल्यागेल्या आधी dormitory मध्ये गेलो आणि हातपाय धुवून फ्रेश झालो. आधीच पोहोचलेल्या लोकांनी tent साठी dormitory जवळच एक जागा शोधून ठेवलेली ती पाहून घेतली आणि तिथे tent उभारण्याची तसेच रात्रीच्या जेवणासाठी चूल बनवण्याची तयारी सुरू केली. आजूबाजूला फिरून चुलीसाठी मिळेल तसं सरपण, सुक्या काट्या शोधायला सुरुवात केली. पण आम्ही जिथे tent उभारणार होतो आणि जिथे चूल मांडणार होतो ती एक पुरातत्व विभागाची उत्खनन सुरू असलेली किंवा झालेली एक जागा आहे हे आम्हा कोणालाच माहीत न्हवत. तिथे लक्ष ठेवण्यासाठी एक CCTV camera लावला होता त्याकडेही कोणाचं लक्ष गेलं नाही. आमची ही सगळी तयारी त्या कॅमेऱ्यामधून गडाखालच्या पुरातत्व विभागाच्या माणसांनी पाहिली आणि त्यामुळे काहीवेळातच गडावरील security person आम्हाला थांबवायला आले. सोबत ते असंही म्हणत होते की गडावर कुठेच tent टाकून झोपायला आणि चूल पेटवायला परवानगी नाहीये त्यामूळे काही वेळ वातावरण जरा गंभीर होतं. आम्हाला या गोष्टीची माहितीच न्हवती. tent मध्ये राहायचं असा आमचा plan त्यामुळे इथून जायचं तर झोपायच कुठे रात्रीचं जेवण बनवायचं कुठे असा प्रश्न उभा राहिला. शेवटी जागेचं महत्व जाणुन ती जागा आम्ही सोडली, tent गुंडाळले. सगळ्यांनी dormitory मध्येच adjust करून झोपायचं ठरलं. पण गोळा केलेल्या सरपण-काट्या फेकून न देता सोबतच ठेवल्या कारण झोपायचा प्रश्न सुटला होता रात्रीच्या जेवणाचा नाही. आजूबाजूला बरंच फिरून पाहिलं, पण आधीच गडावर चूल पेटवण्यासाठी परवानगी नसल्यामुळे सुरक्षित अशी कोणती जागा मिळत नव्हती. मग हत्ती तलावाच्या वरच्या बाजूला एक धर्मशाळा आहे, तिथे गाईंचा एक मोकळा गोठा होता त्यामध्ये आम्ही चूल पेटवण्याचा प्रयत्न केला. पण ती जागा मोकळी आणि open असल्यामुळे चूल पेटवण्यास वाऱ्यामुळे अडथळा येत होता.
रात्री जेवणापूर्वी दिवेशचा birthday cake कापल्यावर
रात्री जेवणापूर्वी दिवेशचा birthday cake कापल्यावर 

शेवटी मग आम्ही धर्मशाळेच्या रखवालदाराला विचारलं, त्यांनी आम्ही आणलेलं सामान, भाज्या वापरून भाजी बनवून द्यायचं मान्य केलं आणि त्यांच्याकडील थोड्याफार भाज्या आमच्या भाजीत वापरून आम्हाला भाजी बनवून दिली. भाजी तयार झालेली चपात्या आधीच घरून आणलेल्या. अशा प्रकारे आमच्या रात्रीच्या जेवणाची तयारी झाली. धर्मशाळेत लोकांची भरपूर गर्दी होती. काही लोक गडावर मुक्कामासाठी धर्मशाळेमध्ये उतरली होती. त्यांचंही जेवण संपत आलेलं. त्यांनी त्यांचे अंथरूण-पांघरूण टाकून ठेवलेले होते. त्यामुळे थोडीशी जागा बनवून आम्ही जेवायला बसलो. पण आधी अजून एक कार्यक्रम बाकी होता तो म्हणजे वाढदिवस साजरा करायचा. आदल्याच दिवशी म्हणजे २१ जूनला दिवेशचा वाढदिवस होता. स्वराज पुण्यावरून येतानाच सोबत cake घेऊन आलेला. रायगडावर cake कापून दिवेशचा त्याच्यासाठी अविस्मरणीय केला आणि जेवायला सुरुवात केली. गडावरच्या त्या थंडगार वाऱ्यात पोटभरून जेवण झालं. जेवण आवरून, भांडी धुवून सगळं आवरायला सव्वा दहा वाजले. तिथून पुन्हा dormitoryकडे जायला होळीचा माळ, नगारखान्यासमोरून जावं लागतं. पावसाळ्याच आल्हाददायक वातावरण, थंडगार वारा, धुकं यामुळे आम्ही जाताजाता होळीच्या माळावर गप्पा मारायला बसलो. आमच्याकडील बॅटऱ्या आम्ही मुद्दाम बंद करून ठेवलेल्या. सभोवताली काळाकुट्ट अंधार होता. पण थंडगार वारा, धुकं यामुळे अंधाराचा विसर पडला होता. गड आता धुक्यात हरवून गेला होता आणि आम्ही सगळे इतिहासाच्या गप्पांत..! गडावर रात्री फिरायला परवानगी नसल्यामुळे काही वेळ तिथे बसून dormitoryकडे निघालो. रात्री UNO खेळण्याचा planning होता. गेल्यागेल्या आपापल्या जागा पकडल्या आणि खेळायला बसलो. दंगामस्ती, cheating करत कसा वेळ गेला कळालच नाही.

दिवस दूसरा:
दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला मला ७ वाजलेले पण सगळे उठण्याआधी पहाटे ६ लाच उठून आदित्य हिरकणी बुरुज आणि बाकी गड बऱ्यापैकी फिरून आला. ७ नंतरच आम्ही सगळे उठून तयार झालो. मग सर्वजण मिळून गड फिरायला आणि फोटो काढायला सुरुवात केली. सोबतच अधूनमधून येणाऱ्या धुक्याची आणि पावसाच्या हलक्या सरींची साथ होती. आम्ही एक गाईड घेतलेला तो त्याच्या वेळेला ८ वाजता हजर होता. आणि मग आमची मेणा दरवाज्यापासून रायगडाची भटकंती सुरु झाली. वास्तूच्या इतिहासासोबतच तिचं ऐतिहासिक महत्व आणि संरक्षणात्मक बारकावे काळजाला भिडेल अश्या आवाजात ऐकून स्फुरण चढत होतं.





राजदरबारातील सिंहासनाकडे जाणाऱ्या पायऱ्यां, तिथल्या बांधकामातील बारकावे, यांसोबत राजधानी म्हणून हाच गड का? अश्या सगळ्या प्रश्नांबद्दल आणि इतिहासाबद्दल माहिती मिळाली. राजसदर, होळीचा माळ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर व त्यास लागून असलेली महाराजांची समाधी, टकमक टोक असे सर्व पाहून आणि त्याची माहिती ऐकली. बाजार पेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूकोठाराचे अवशेष आहेत ते पाहिले. टकमक कड्यावर जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे सावध राहणं महत्वाच आहे. सध्या तिथे रेलिंग्ज बांधले आहेत. पण काही अति उत्साही लोकं ते पार करून त्या असुरक्षित ठिकाणी फोटो काढायला जातात.
गडावरून दिसणारं निसर्गाचं नयनरम्य सौंदर्य
गडावरून दिसणारं निसर्गाचं नयनरम्य सौंदर्य

जगदीश्वर मंदिरावरून दिसणारा नगारखाना, राजदरबार बाजारपेठ आणि समोर काही वाड्यांचे अवशेष
जगदीश्वर मंदिरावरून दिसणारा नगारखाना, राजदरबार बाजारपेठ आणि समोर काही वाड्यांचे अवशेष
टकमक टोकाकडे जाणारी वाट
टकमक टोकाकडे जाणारी वाट
असे काही मूर्ख अति उत्साही लोकं फोटो काढण्यासाठी धोकादायक ठिकाणी जाऊन जीव धोक्यात घालतात
असे काही मूर्ख अति उत्साही लोकं फोटो काढण्यासाठी धोकादायक ठिकाणी जाऊन जीव धोक्यात घालतात
असो, पण खरंच रायगड खूप मोठा किल्ला आहे, एक अख्खं गाव त्यावर वसवलं होतं महाराजांनी. तो समजून घ्यायला आणि पाहायला एक अख्खा दिवस कमी पुरतो. पण वेळेच बंधन होतं. एव्हाना आम्हाला अकरा वाजलेले. पुन्हा माघारी रिसॉर्टवर पोहोचायला तिथून रोप-वेने खाली जायला दिड-दोन तास जाणार आणि मग परतीचा प्रवास. त्यामुळे आमचा ट्रेक काहीसा आटोपता घेतला. साधारण पावणे एक पर्यंत आम्ही सगळे रोप-वेने पायथ्याला पोहोचलो. एका घरगुती खानावळी मध्ये सगळ्यांच्या जेवणाची ऑर्डर दिली. अर्धा तासात गरमागरम पिठलं आणि तांदळाच्या भाकऱ्या हजर होत्या. पोटभर पिठलं-भाकरी त्यानंतर पिठलं-भात खाल्लं. रायगड trekच्या आठवणी मनात साठवत आणि जाताजाता पुन्हा एकदा राजमाता जिजाबाईंच्या समाधीला नमस्कार आम्ही सगळे परतीच्या प्रवासाला लागलो.

आज आभाळ अगदी मोकळं होतं. मी दिवेश सोबत त्याच्या मोटारसायकलवर बसलेलो. आम्ही सर्व मोटारसायकलधारी हळूहळू नागमोडी घाट-वळणे एकामागे एक पार करत होतो. एक मोटारसायकल आणि कार आमच्यापासून बरंच पुढे गेलेल्या. आमच्या पुढे २ मोटारसायकली आणि मागे एक असं आम्ही ४ मोटारसायकली एकामागे एक निघालो. आणि घाट उताराच्या एका वळणावरती आमची मोटारसायकल वर येणाऱ्या कारला एकाबाजूने धडकली अन मी आणि दिवेश गाडीवरून फेकलो गेलो. मला अजूनही आठवतंय की फेकलं जाताना माझी त्या कारला आधी धडक बसली आणि मग मी रस्त्याच्या मधोमध उताणा पडलो. दिवेश रस्त्याच्याकडेला व त्याच्यापुढे मोटारसायकल अस्ताव्यस्त पडलेली. फक्त काही सेकंदाची घटना ती, आजही माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते.

अपघातातील कार
अपघातातील कार

अपघातानंतर रस्त्याच्या बाजूला बसलेलो मी
अपघातानंतर रस्त्याच्या बाजूला बसलेलो मी

त्यावेळी आदित्यची मोटारसायकल आमच्या मागे असल्याने अपघात झाल्यानंतर अगदी काही सेकंदानंतर तोच सर्वप्रथम आमच्याजवळ पोहचला. गडबडीत गाडी बाजूला लावून आणि खाली उतरून तोच मला सावरू लागला. पण माझ्या उजव्या भुवईमधून मोठ्या प्रमाणात रक्त वाहताना दिसलं आणि त्याच्या हातापायातील त्राणच गेला. त्याने मला "ठीक आहेस ना रे..." असं दोन तीनदा विचारल्यानंतर मी "मी ठीक आहे, दिवेश बघा" असं म्हटल्यावर त्याला हायसं वाटलं. दिवेशही उठून उजवा हात हातात धरून आमच्याकडे चालत येत होता. मग कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. दिवेशला प्रथमदर्शी फार काही जखम झालेली दिसत नव्हती परंतु माझ्या उजव्या भुवईजवळील जखमेतून प्रचंड रक्त येत होतं.

अपघाताचे ठिकाण अतिशय दुर्गम असल्याने कोणासही संपर्कही होत नव्हता. परंतु मला लवकरात लवकर हॉस्पिटलात पोहचवणे गरजेचे होते. आणि मला दुचाकीवर बसने शक्य होत नव्हते व ज्यांच्या वाहनाशी अपघात झाला होता ते व्यक्तीही मदतीस तत्पर दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी भांडत वेळ घालवण्यापेक्षा मग आदित्यने पुढे निझामपूरला जाऊन मदत घेऊन यावी व तोपर्यंत बाकी लोकांनी फोनवर स्वराजला(आमचा एकमेव चारचाकी धारक) संपर्क करीत रहावं असं ठरलं. आणि तो स्वराजला लवकर घेऊन यायला निघून गेला.

त्या दुर्गम स्थळी काहीच सुविधा न्हवती. कोणाच्या गाड्यांमध्ये First-Aid होतं. त्यात medical cotton-bandage tape होतं पण मलम न्हवत. त्यात परत पावसाची एक सर येऊन गेली. अखेर अर्ध्यातासात आदित्य कार घेऊन आला. मला आणि दिवेशला गाडीत बसवून निझामपूरच्या दिशेने पाठवलं. ज्यांच्या गाडीशी अपघात झाला होता त्या व्यक्ती मात्र नुकसान भरपाईसाठी अशाही स्थितीतही हुज्जत घालत होत्या, आणि त्यांच्यामुळे मला आणि दिवेशला निझामपुरातील इस्पितळात सोडून स्वराज, रिषभ, कुणाल, स्वराजचे वडील या सगळ्यांना माणगाव आणि नंतर महाड पोलीस चौकीपर्यंत जावं लागलं. त्यासाठी त्यांना दुपारी अडीचला अपघात घडल्यापासून रात्री सात-आठ वाजेपर्यंत असं फिरावं लागलं. एकीकडे माझी आणि दिवेशबद्दलची चिंता आणि दुसरीकडे त्या व्यक्तींच्या आडमुठेपणामुळे होत असलेला मनस्थाप अश्या दुहेरी मनःस्थितीतून सगळे त्यावेळी जात होतो. आम्हालाही निजामपूरमध्ये हॉस्पिटल मिळायला खूप फिरावं लागलं. पण त्याचवेळी राहुल अपघाताच्या त्या दुर्गम आणि निर्जनस्थळी पावसात एकटा गाडी सोबत रात्री ७ वाजेपर्यंत थांबलेला. त्याने तिथे साप विंचू समोरून जाताना पाहिले, काळाकुट्ट अंधार पडलेला असतानाही तो त्याठिकाणी रात्रीपर्यंत थांबून राहिला. शेवटी सगळं मार्गी लागल्यावर तो दिवेशची गाडी घेऊन आला. तोपर्यंत आम्ही एका दवाखान्यातून मलमपट्टी करून निजामपूरला एका हॉटेलमध्ये इतरांची वाट पाहत बसलेलो. वेळेत मदत मिळाल्याने मी बरा होतो पण उजव्या भुवईला ६-७ टाके टाकावे लागले होते. हाताच्या कोपऱ्याला, गुडघ्यांना बरचसं खरचटलं होतं, त्याला bandage केलं. प्रथमदर्शनी ठिकठाक वाटणाऱ्या दिवेशला काही खरचटलं न्हवतं. त्याच्या हाताच्या X-ray scanसाठी आम्हाला निजामपूरवरून माणगावला जावं लागलं, X-ray काढल्यावर समजलं की त्याच्या उजव्या हाताच्या दोन बोटांची हाडं मोडली आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर पुण्याला पोहोचून त्याला हॉस्पिटलमध्ये admit करणं आणि त्यावर शस्त्रक्रिया करणं महत्वाचं होतं. पण हे सगळं होईपर्यंत रात्रीचे ९ वाजलेले त्यामुळे एवढ्या रात्री ताम्हिणी घाट पार नको करायला म्हणून मग आम्ही मुक्काम करायचा निर्णय घेतला. आणि आमचा मुक्काम त्या रात्री माणगावात एका हॉटेलमध्ये पडला.


दिवस तिसरा:
दोन दिवसाचा trek अश्याप्रकारे तीन दिवसाचा झालेला. माझ्या घरी या अपघाताबद्दल काहीच सांगितलेलं न्हवतं. पण उशीर झाला निघायला आणि अंधार झाल्यामुळे मुक्काम करणार आहोत असं अर्धवट सत्य सांगितलं. दुसऱ्या दिवशी नाष्टा वगैरे उरकून आम्ही पुण्याच्या दिशेने साडेअकराच्या सुमारास निघालो. यावेळी सर्वजण जरा काळजी घेऊनच गाड्या पळवत होते. पण अपघातानंतर सुध्दा कोणाच्याच उत्साहात कमी न्हवती. पुण्याला परत जाताना मुळशी dam backwaterला सगळ्यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडावरील कैऱ्या पाडल्या. काही तिथे खाल्ली आणि २०-२५ सोबत घेतली. पुण्यात गेल्यागेल्या आधी दिनानाथ मंगेशकर ला आम्हा दोघांना दाखवलं, डोळ्यांच्या जवळ जखम झाल्यामुळे डोळे तपासून पाहिले पण सुदैवाने सगळं ठीक होतं. दिवेशला आधी चेक केलं आणि नंतर admit करून घेतलं. त्यानंतर त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि दोन्ही बोटांच्या हाडांना तारेने आधार दिला.

आम्ही आमचा प्रत्येक trek एकमेकांची काळजी आणि सुरक्षेची दक्षता घेऊनच करतो त्यामुळे trek करताना किंवा गड चढताना/उतरताना कधीच कसला अपघात झाला नाही. पण प्रवास हा नेहमीच unpredictable असतो, प्रवासात कधी काय होईल कोणीच सांगू शकत नाही. पण ट्रेकिंगचा आनंद घेत आणि अनपेक्षित आव्हानांना अश्याप्रकारे तोंड देत आमचा रायगड ट्रेक अनेक अर्थांनी आठवणीत राहिला.

Comments