महात्मा फुले वाडा आणि राजा दिनकर केळकर संग्रहालय

महात्मा फुले वाडा आणि राजा दिनकर केळकर संग्रहालय
०२ ऑक्टोबर २०२२



शिक्षणासाठी २०१२मध्ये मी पुण्या राहण्यास आलो. त्या आधीच्या आयुष्यात, मी पुण्यात मोजून ४-५ वेळाच आलो असेल. पण २०१२पासून जी नाळ पुण्यासोबत जोडली गेली ती कायमचीच. गेल्या ऑगस्ट महिन्यात मला पुण्यात येऊन आता १० वर्षे पूर्ण झाली. या १० वर्षात पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात होत असलेली बरेचशी बदल, विकासकामं पाहिली. पुणे फिरलो. आजूबाजूचे किल्ले फिरलो, अजूनही बरेचशी बाकी आहेत. मला ऐतिहासिक अश्या वस्तू आणि वास्तू पाहायला, त्यांचा इतिहास जाणून घ्यायला, त्यांच्यामागील ऐतिहासिक गोष्टी ऐकायला खूप आवडतं. तसा नववीपर्यंत इतिहास हा माझा नावडताच विषय होता पण का कोण जाणे दहावीपासून इतिहासात आवड निर्माण झाली ती आज तागायत. त्यामुळे २०१२ला पुण्यात येण्याच्या आधीपासूनच पुणे शहरातल्या बऱ्याचशा जुन्या वास्तू, संग्रहालय, पेशवेकालीन मंदिर पहायची, आसपासची सगळी किल्ले पहायची असं मनाशी ठरवलं होतं. अशांपैकीच महात्मा फुले वाडा आणि राजा दिनकर केळकर संग्रहालय. गेल्या कित्येक वर्षांपासून तिथे जायचं म्हणत होतो पण घराच्या अगदी मागेच असूनसुद्धा इतक्या वर्षात कधी भेट देऊ शकलो नाही.

आज टिंबर मार्केटकडे जाणार होतो त्यामुळे येताना कसल्याही परिस्थितीत महात्मा फुले वाड्याला भेट द्यायचीच हे ठरवलं होतं. टिंबर मार्केट मधलं काम उरकलं आणि सोबतच असलेल्या बहिणीला, आकांक्षाला, सोबत येण्याबद्दल विचारलं तर तिनेही होकार दिला. मग दोघेही वाड्याच्या दिशेने निघालो. मनात आधीच शंका होती कि आज वाडा चालू असेल की नाही कारण आज रविवारी तर होताच पण वाडा शासकीय सुट्ट्यांना बंद असतो. आणि आजतर गांधी जयंती पण सुदैवाने वाडा चालू होता.

स्त्रीशिक्षणासाठीची देशातील पहिली शाळा ज्यांनी सुरु केली, ज्यांनी विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन दिलं, सार्वजनिक पाणवट्यावर अस्पृश्यांना पाणी भरू दिले जात नसताना स्वतःच्या वाड्यातील विहीर खुली केली, ज्यांनी अस्पृश्यांच्या मानवी हक्कांसाठी आणि उद्धारासाठी जीवन खर्च केले, वेळोवेळी उच्चवर्णीय लोकांकडून छळ सहन करावा लागला अशा सामाजिक चळवळीचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुले दाम्पत्यांच्या वाड्याला भेट देणं म्हणजे माझ्यासाठी एक पर्वणीच होती. महात्मा फुलेंच्या जीवनातील अनेक घटनांशी व त्यांच्या सामाजिक चळवळींशी या वास्तूचे अतूट नाते आहे. हा वाडा १९२२ मध्ये श्री. सावतामाळी फ्री बोर्डिंगचे आश्रयदाते श्री. बाळा रखमाजी कोरे यांनी श्री. अर्जुना पाटील बोवा यांच्याकडून रु.१५००/- इतक्या रकमेच्या मोबदल्यात खरेदी केल्याची नोंद मिळते. १९२२ पासून या ठिकाणी श्री सावतामाळी फ्री बोर्डींग चालविले जात होते. पुढे १९६९ मध्ये त्याचे महात्मा फुले वसतिगृह असे नामकरण करण्यात आले. महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० नुसार हा वाडा इ.स.१९७२ मध्ये राज्य संरक्षित स्मारक म्हणुन घोषित करण्यात आला असुन त्याचे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभागामार्फत मूळ स्वरुपात जतन केले जात आहे.


वाड्यामध्ये प्रवेशद्वाराबाहेर डाव्याबाजूला तुळसी वृंदावनाच्या जागी महात्मा फुलेंची समाधी आहे. वाड्यामध्ये प्रवेश केल्या केल्या आहे ते अंगण. अंगणात डाव्या हाताला विहीर आहे. अंगणातून पुढे आलो की आधी लागते ती वाड्याची पडवी. पडवीतून उजव्या बाजूला गेल्यावर स्वयंपाक घर आहे तर डावीकडे गेलो कि बैठकीच्या खोलीकडे जातो. पडवीला दोन दरवाजे आहेत दोन्ही माजघरात निघतात आणि माजघर डाव्याबाजूच्या बैठकीच्या खोलीला आतून जोडलेलं आहे. माजघर, बैठकीची खोली आणि स्वयंपाकघराच्या खोलीमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांची भित्तीचित्रे, महात्मा फुलेंचं मृत्युपत्र, शिवाजी महाराजांवरील पोवाडा, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी या पुस्तकांच्या पहिल्या पानाची चित्रे, महात्मा फुलेंच्या या लढ्यातील जवळची विश्वासू माणसं, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांची तैलचित्रे लावलेली आहेत. सरकारने वाड्याच्या आजूबाजूच्या घरांची जागा अधिग्रहीत करून त्या भागात काही सुविधा, भित्तिशिल्प आणि सजावट केली आहे.

माजघर
माजघर
स्वयंपाकघर

महात्मा फुलेंच्या या वाड्याला भेट दिल्यावर त्यांनी स्त्रीशिक्षणासाठी, विधवा पुनर्विवाहासाठी, अस्पृश्य लोकांच्या मानवी हक्कांसाठी आणि उद्धारासाठी केलेल्या कार्याची महती आल्याशिवाय आणि त्यांच्या कार्यातून प्रेरित झाल्याशिवाय राहणार नाही.

त्यानंतर आम्ही दोघे घरी जाण्यास निघालो, पण बाजीराव रोडने जात असताना आकांक्षाने राजा दिनकर केळकर संग्रहालयाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. मीही खूप दिवसांपासून जायचं म्हणतच होतो त्यामुळे गाडी तिकडे वळवली. संग्रहालयाच्या वेळेबद्दल, प्रवेश फीबद्दल आम्हाला काहीच माहिती न्हवती. आम्ही २ तिकीट द्यायला सांगितलं आणि त्यांनी direct रु.२०० मागितले. आम्ही क्षणभर हापकलो. कारण संग्रहालयाची प्रवेश फी रु.१०० असेल अशी आम्हाला अपेक्षाच न्हवती, आम्हाला वाटलं जास्तीत जास्त ४०-५० असेल. पण शेवटी संग्रहालय तर पाहायचं होतं. तिकीट काढून प्रवेश केला आणि संग्रहालयातील वस्तू पाहायला सुरुवात केली.

पुण्यातील ‘छुपा खजिना’ असे नेहमी ज्याचे वर्णन केले जाते असे हे राजा दिनकर केळकर संग्रहालय म्हणजे तीन मजली इमारत आहे. इथे पुण्यभूषण पद्मश्री डॉ. दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी म्हणजेच काकासाहेब केळकर यांनी सन १८९६ ते १९९० मध्ये वैयक्तिकरित्या जमवलेल्या असंख्य कलावस्तूंचा संग्रह आहे. त्यांच्या कॉलेज जीवनात काकांना जुनी नाणी, टाकून दिलेली कुलुपे, खेळणी अशा ‘जुन्या वस्तू’ गोळा करण्याचा नवा छंद जडला. सुरुवातीला त्या गोळा करण्याचे स्वरूप ‘जे मिळेल ते’ असे होते. त्यामागे विशिष्ट असा हेतू नव्हता. मात्र त्यांना त्या पुरातन वस्तू मिळवून त्यांची देखभाल करण्यात खूप आनंद मिळत होता. राजा दिनकर केळकर संग्रहालय स्थापन करण्याच्या प्रवासाची ती सुरुवात होती. त्यांच्या विद्यापीठाच्या शिक्षणात खंड पडून ते अपुरेच राहिले होते आणि कमाईही बेताची होती. असे असले तरी त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती आणि जिद्द यांच्या बळावर त्यांनी एकट्याने २१००० हून अधिक पुरातन वस्तू जमवल्या. त्यांना ऐतिहासिक वस्तू जमवण्याची तीव्र आवड आणि दुर्मिळ अशी दूरदृष्टी होती. ती असल्यामुळेच त्यांनी कायमचे दृष्टीआड होऊ शकणारे भूतकाळाचे अवशेष जतन केले आणि पुढच्या पिढीसाठी त्याचे संग्रहालय केले. संग्रहालयाला दिनकर केळकर यांच्या राजा नावाच्या अल्पावयात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव दिले आहे. या संग्रहालयाची सुरुवात सन १९२० मध्ये झाली. आपले पिढीजात चष्म्याचे दुकान चालवताना दिनकर केळकरांनी जुन्या सरदार घराण्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू तसेच इतर वस्तू या संग्रहात जोडल्या.

या संग्रहात तुम्हाला लाकडी नक्षीकाम केलेली छत, बारीक आणि नाजूक कोरीव काम केलेले लाकडी दरवाजे आणि खांब, खिडक्या, गणेशपट्या, झरोके, लाकडी तसेच संगमरवरी जयविजय, मीनाक्षी, पंचमुखी मारुती यांचे पुतळे, पितळी दीपस्तंभ, पाषानाच्या मूर्ती पाहायला मिळतील. या वस्तू त्यांनी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, दक्षिण भारत, पश्चिम बंगाल अशा वेगवेगळ्या राज्यातून जमविल्या आहेत. जुन्याकाळातील रोजच्या वापरातील अगदी फुंकणीपासून ते अत्तरदाणीपर्यंतच्या नाना चीजा त्यांनी जमा केल्या. विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, गंजीफा, सोंगट्या, शस्त्रे, पानदाने, पेटारे, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या अशांनी केळकरांचा खजिना समृद्ध, संपन्न आहे. कोथरूड येथून त्यांनी उचलून आणलेला मस्तानीचा महाल या संग्रहालयात त्यांनी हुबेहूब जसाच्या तसा उभा केला आहे.

मस्तानीचा महाल

या संग्रहालयात वेलबुट्टीदार पडदे, धातूची भांडी आणि उपकरणे, व्यक्तिचित्रे, आणि इतरही चित्रे, व्हिक्टोरियन शैलीतले फर्निचर, स्त्रियांचे उत्कृष्ट दागदागिने, आरसे आणि गालिचे आहेत. तलवारी, बंदुका, देशी पिस्तुले, भाले, बरच्या, यासारखी हत्यारेही इथे गोळा केलेली आहेत. प्रसाधने विभागात तळपाय घासण्यासाठी वापरीत असलेल्या वजा-या, कुंकुमकरंडे, वेणीफणीच्या पेट्या, सुरमादान, अत्तरदान, कंगवे,फण्या, दागदागिने पाहायला मिळतील. जुन्याकाळातील आपल्या पिढीला माहिती देखील नसतील अशी धान्य मोजण्याची मापं, तुंबक नारी, सुरबहार, ताऊस, नंदूनी, रबाब, गोटुवाद्याम, सारींदा, किनी-किट्टी, मोंदई, गुमट्टई, कवन मद्यलम, तिलिमा, अराबचट्टी, पुष्करम, झिला, पंबई अशी वेगवेगळी वाद्ये, काशिदाकारी चंद्रकळा, अचकन, चर्म चित्रे, कंथा, सूर्य दिवा, टांगता शिखर दीप अशा वस्तू, पट चित्रे, नाख चित्रे अश्या दुर्मिळ प्रकारच्या वस्तू पाहायला मिळाल्या.

संग्रहालयात काढलेले काही फोटो
 

 

 

 

सगळा संग्रह पाहायला आम्हाला जवळपास अडीच तास लागले, शेवटची काही दालन आटोपती घेतली. पण वेळेचं चीज झाल्याच समाधान होतं आणि तिकीट काढताना २०० रुपये देताना आम्ही जे गोंधळलो होतो ते चुकीचं होतं हे जाणवलं. तुम्हीसुद्धा एकदा या संग्रहालयाला नक्की भेट द्या आणि इतिहासात रमून जा.

संग्रहालयाबद्दल अधिक माहिती गोळा करताना खालील सुंदर लेख मला सापडले ते जरूर वाचा.

Comments