कोथळीगड(Kothaligad fort) Trek
कोथळीगड trek २३ डिसेंबर २०१८ मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळच्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. गडावरील पायऱ्या दगडी पाषाणाच्या असून कोथळ्यासारख्या(पोटातील आतडे) कोरलेल्या आहेत म्हणून कोथळीगड नाव. पेठ गावाच्या निकटतेमुळे याला 'पेठचा किल्ला' असेही म्हणतात. पहाटे ६ च्या सिंहगड एक्सप्रेसने मी, स्वराज राजपुत आणि आशिष पाटकर कर्जत च्या दिशेने निघालो. आशिषचे जवळचे मित्र असलेले अभिनव पानसरे, निखिल म्हस्के, हेमंत शहासने, प्रसाद प्रधान हे सगळे मुंबईच्या दिशेने कर्जत पर्यंत येणार होते. ठरलेल्या वेळी आम्हा सगळ्यांची कर्जतच्या रेल्वे स्टेशन वर भेट झाली. आणि मग एकमेकांची भेट घेऊन ओळख करून देऊन आम्ही सगळे श्रीराम पुला च्या दिशेने पायी रपेट सुरु केली. कोथळीगडाला कर्जतहून कोठिंबे किंवा आंबिवली गावी बसनेपण जाता येते. कर्जत(पूर्व) रेल्वे स्टेशनपासून कशेळेमार्गे जाणारी आंबिवली बस आहे. श्रीराम ब्रिजवरून तुम्हाला प्रायव्हेट रिक्षा किंवा जीपापण भेटतात. त्याप्रमाणे आम्ही तिथे जाऊन चौकशी केली...