कोथळीगड(Kothaligad fort) Trek

कोथळीगड trek
२३ डिसेंबर २०१८

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळच्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. गडावरील पायऱ्या दगडी पाषाणाच्या असून कोथळ्यासारख्या(पोटातील आतडे) कोरलेल्या आहेत म्हणून कोथळीगड नाव. पेठ गावाच्या निकटतेमुळे याला 'पेठचा किल्ला' असेही म्हणतात.

पहाटे ६ च्या सिंहगड एक्सप्रेसने मी, स्वराज राजपुत आणि आशिष पाटकर कर्जतच्या दिशेने निघालो. आशिषचे जवळचे मित्र असलेले अभिनव पानसरे, निखिल म्हस्के, हेमंत शहासने, प्रसाद प्रधान हे सगळे मुंबईच्या दिशेने कर्जत पर्यंत येणार होते. ठरलेल्या वेळी आम्हा सगळ्यांची कर्जतच्या रेल्वे स्टेशन वर भेट झाली. आणि मग एकमेकांची भेट घेऊन ओळख करून देऊन आम्ही सगळे श्रीराम पुलाच्या दिशेने पायी रपेट सुरु केली.


कोथळीगडाला कर्जतहून कोठिंबे किंवा आंबिवली गावी बसनेपण जाता येते. कर्जत(पूर्व) रेल्वे स्टेशनपासून कशेळेमार्गे जाणारी आंबिवली बस आहे. श्रीराम ब्रिजवरून तुम्हाला प्रायव्हेट रिक्षा किंवा जीपापण भेटतात. त्याप्रमाणे आम्ही तिथे जाऊन चौकशी केली. बरीच पैशांची झिकझिक केल्यावर एक जीपवाला तयार झाला. आम्हाला तिथे सोडून परत आम्हाला घ्यायला येणार होता. सकाळचे साडे आठ वाजलेले आणि सगळ्यांना खूप भूक लागलेली. त्याच चौकात खोत वडेवाले म्हणून एक जुना प्रसिद्ध वडेवाला आहे तिथे मग गरमागरम वड्यांवर मस्तपैकी ताव मारला. सकाळचा नाश्ता उरकून आणि ताजेतवाने होऊन मग नऊ वाजता आमची जीप आंबिवली गावाच्या दिशेने निघाली. पाऊण तासाचा प्रवास करून आंबिवली जवळ पोहोचलो. दुरुनच कोथळीगडाचा सुळका दिसू लागल्यावर मला कर्नाळा, रतनगड, माहुली आठवतात. तिथल्या सुळक्यावर जायचे म्हणजे रॉक क्लायबिंगची तयारी करावी लागते. इथे मात्र आपल्याला अशी कोणतीही तांत्रिक चढाई न करता सुळक्याच्या माथ्यावर जाता येते.

आंबिवलीला जाताना दुरुन दिसणारा कोथळीगडाचा सुळका

आंबिवलीजवळ एक छान तळे आहे. तिथून चढ लागतो. हल्ली मोठ्या प्रमाणात येणार्‍या ट्रेकर्समुळे गावकर्‍यांना बराच रोजगार मिळाला आहे. पायथ्याच्या गावातील काही घरात आपल्या रहाण्या-जेवणाची सोय होते. आता गावात बरीचशी हॉटेल्स झाली आहेत. त्यामुळे जेवणाचा प्रश्न पडत नाही. गड चढायला सुरुवात करतानाच ऑर्डर देऊन ठेवायची. आणि गड पाहून उतरून आलं कि पोटभरून जेवण करायचं. आंबिवली गावात ‘कोथळीगड’ नावाचे हॉटेल आहे. तिथेच आम्हीदेखील आमची ऑर्डर दिली. दहा वाजेच्या आसपास आम्ही गडाच्या दिशेने मार्गस्थ झालो.
 
कोथळीगड तसा छोटासाच किल्ला आहे. परंतु आंबिवली गावातून गडावर जाण्याचा मार्ग हा दोन अडीच तासाचं डोंगरी चढण आणि बऱ्यापैकी उघड्या माळरानावरुन असल्याने दमछाक करणारा आहे तसेच उन्हाचा त्रासदेखील होतो. त्यामुळे मुबलक पाणी सोबत ठेवलेलं बरं कारण पाण्याचे स्रोतही कमी आहेत. काहीसा खडा चढ चढून साधारण दिड तासाच्या चढाई नंतर आपण माचीवर पोहोचतो. तिथे एक आदिवासी वस्ती आहे. गडावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची माहिती ते ठेवत होते आणि प्रवेशशुल्क म्हणून काही रक्कम. इथलं प्रवेशशुल्क घेणं हे एखाद्या ग्रामसमितीच्या अंतर्गत वाटलं नाही पण हरकत नाही कारण हीच मंडळी आपल्याला अडचणीच्या वेळी मदतीला धावून येतात. त्यांच्याकडेही शेती सोडून बाकी काहीच उत्पन्नाचं साधन नसतं. आणि हा पैसा ते गडासाठी आणि त्यांच्या वस्तीसाठी वापरणार असतील तर हरकत काय.

थोड्याशा बिकट चढणीनंतर वाट आपल्याला सरळ किल्ल्याच्या प्रवेशदाराशी घेऊन जाते. पायवाटेने वर पोहोचल्यावर कातळकोरीव पायर्‍यांचे नजरेला पडतात. याच्यापुढे चढून गेल्यावर बांधीव प्रवेशद्वाराचे अवशेष दिसतात. याचा अर्थ सुळक्याभोवती पुर्ण तटबंदी बांधून दुर्गनिर्मिती केली असावी. इथून आपण  शेवटचा चढ चढून कातळकोरीव गुहेपाशी येतो. इथे पोहोचेपर्यंत आम्हाला बारा वाजले होते.

किल्यावर एक मुख्य आणि बाकी तीन अशा एकूण चार गुहा आहेत. त्यातील ही मुख्य गुहा. इथेच बाहेर मोकळ्या भागात काही पंचरसी तोफा पडल्या आहेत. याच मोकळ्या भागात सुळक्याला बुरुजावाजा दगडाचं बांधकाम केलेलं आहे. हा गडाचा उत्तरेकडील भाग असल्यामुळे सावलीतली थोडी मोकळी जागा बसायला मिळाली मग घरून खायला जे आणलं होतं बाहेर काढून आरामात खात बसलो, पाणी प्यायलो आणि ताजेतवाने होऊन गुहा पाहायला निघालो.

पंचरसी तोफ
प्रवेशद्वाराला असलेली तटबंदी





मुख्य गुहेच्या अलिकडे एक देवीचं मंदिर आहे पण इथेदेखील महिलांना प्रवेशास बंदी आहे. असो गावकऱ्यांची श्रद्धा शेवटी, मी गुहेबद्दल बोलतो. त्या मंदिरानंतर आकाराने मोठी असलेली भैरोबाची गुहा लागते. भैरोबाच्या गुहेत छताला आधार देणारे मूळ पाषाणातून कोरीवकाम करून काढलेले नक्षीदार खांब आहेत. खांबावर बरेच शिल्पपट कोरलेले दिसतात. गुहेत ४-५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जुने तोफेचे गोळे आहेत. गुहेतील नक्षीकामावरून गुहा राष्ट्रकुट कालावधीतील असावी असा माझा अंदाज आहे. आतील सांडपाणी बाहेर जाण्यासाठीची व्यवस्थादेखील आहे. सपाट, समतल भूमी आणि छताला आधार देणारे त्यामुळे हि गुहा मुक्कामासाठी उत्तम आहे. गुहेमध्ये १०-१२ माणसं आरामात मुक्काम करु शकतील एवढी प्रशस्त जागा आहे. गुहेजवळच किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी एका ऊर्ध्वमुखी भुयारात एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना खोदलेला आहेत, याच त्या कोथळ्यासारख्या कोरलेल्या पायऱ्या. त्यानंतर आम्ही गडाला एक प्रदक्षिणा मारायला निघालो, हा प्रदक्षिणा मार्ग जरा अवघड आहे कारण पाय जर का घसरला तर बाजुच्या खोल दरीत कोसळू शकता. याच मार्गावर गडाच्या उत्तर टोकाशी पाण्याच्या टाक्यांचे दोन समुह तसेच उरलेल्या तीन गुहा आहेत आणि rapplingची एक जागा आहे(एक उभा कातळ), जिथे अभिनवने याआधी rappling केलं होतं.

गुहेतील एका खोलीचा सुंदर दरवाजा
नक्षीकाम केलेले कोरीव खांब

दरवाजाच्या उजव्या
बाजूकडील एक भग्न मुर्ती
खांबावरील देखावे
 
दरवाजावरील गणपती

गडाला प्रदक्षिणा मारून  गडमाथ्यावर जाण्यासाठी पुन्हा त्या ऊर्ध्वमुखी भुयारात खोदलेल्या पायऱ्यांजवळ आलो. या भुयारातून वर जाताना उजव्या हाताला एक नक्षीदार चौकट दिसते. इथे एक खोली असावी, मात्र तिथे जाणे थोडे अवघड आहे. तर इथेच डाव्या हाताला दगडात कोरलेले दालन दिसते. गडमाथ्यावर जाण्याऱ्या या पायर्‍या सुरवातीला व्यवस्थित कोरलेल्या आहेत. मात्र एक टप्पा थोडा अवघड आहे. हा टप्पा पार केला कि आपण कातळकोरीव पायर्‍यांच्या मार्गातून गडमाथ्याकडे पोहचतो. परंतु गडमाथ्यावर जागा अगदी थोडी आहे.

गडाच्या उत्तरेकडील पाण्याच्या टाक्या
गडाचा प्रदक्षिणा मार्ग

गडमाथ्यावर जाणारा कोथळ्यासारख्या जिना
गडमाथ्यावर जाणारा कोथळ्यासारख्या जिना

गडावरील माथ्यावर पाण्याची दोन टाकी आहेत. त्यातील एका टाकीतील पाणी पिण्यायोग्य आणि थंडगार आहे. त्यातील थंडगार पाण्याने तहान भागवली सोबत असलेल्या पाण्याच्या बोटल्स भरून घेतल्या. जवळच पहारेकर्‍यांच्या निवासस्थानाच्या घराचे अवशेष दिसतात. बाकी गडमाथ्यावर पाहण्यासारखं काही नाही. त्यामुळे पाण्याच्या टाकीच्या आजूबाजूला असलेल्या झाडांच्या सावलीत बसून आराम केला, गप्पा मारल्या.

हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो सह्याद्रीच्या कर्जतजवळच्या मूळ डोंगररांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. त्यामुळे गडमाथ्यावरुन गडाच्या पूर्वेला पुर्ण सह्याद्रीचा काळा बॅकड्रॉप दिसतो. उत्तरेला भिमाशंकर अभयारण्य, नागफणी, वाघाचा डोळा, सिद्धगड, कल्याणकडील हाजीमलंग, तर पश्चिम दिशेला चंदेरी, प्रबळगड, इर्शाळगड, माणिकगड, माथेरानचे पठार असा आजुबाजुचा विस्तृत परिसर नजरेच्या टप्प्यात आहे. या किल्ल्याचा लहान आकार यावरून असे वाटते की किल्ल्याचा उपयोग केवळ एक चौकी म्हणून होत असावा. त्यामुळे कर्जतहून खेड-कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात असावा.

गडावरून दिसणारा आसपासचा परिसर

गडावरून दिसणारा आसपासचा परिसर

गडावरून दिसणारा आसपासचा परिसर

ऐन पावसाळ्यात इथे आल्यास खाली ढग आणि आपण गडावर अशी "आज मै उपर, आसमा नीचे" अशी अनुभुती घ्यायला मिळेल. पावसाळा असेल तर इथून कोसळणारे असंख्य धबधबे नजरेला मेजवानी देतात. गडमाथ्यावरील मंद वारा, तेथील जलाशय आणि आजूबाजूची वनराई सुखावह आहे.

आम्ही साधारण दोनच्या सुमारास गड उतरण्यास सुरवात केली आणि साडेतीनला पायथ्याच्या आंबिवली गावात परत पोहोचलो. आमचा जीपवाला एव्हाना पोहोचलेलाच होता. आणि ओर्डरप्रमाणे गरमागरम जेवण 'कोथळीगड' हॉटेल मध्ये तयार होतं. पोटभरून जेवण केल्यानंतर साडे चारला आम्ही कर्जतच्या दिशेने निघालो. परिसरातील लेणी, गडाच्या पोटातील लेणे, कातळकोरीव पायर्‍या आणि दरवाजा आणि शरभ शिल्प या सगळ्याचा विचार केला तर हा गड प्राचीन आहे हे नक्की, पण आज तरी याचा इतिहास अज्ञात आहे. या परिसरात वाहणार्‍या भर्राट वार्‍याचा विचार करुन इथल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पवनचक्क्यांची उभारणी झाली आहे. हा trek मी पावसाळ्यात करण्यास recommend करेल.

Groupसह गडाच्या माथ्यावर
डावीकडून हेमंत, अभिनव, आशिष, प्रसाद, मी आणि स्वराज

उजवीकडून पहिला निखिल


Comments