AMK a Dream Trek

AMK - ALANG MADAN KULANG FORTS
२४ आणि २५ फेब्रुवारी २०१८


AMK म्हणजे अलंगगड, मदनगड आणि कुलंगगड. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विभागातील सर्वात कठीण असे हे तीन किल्ले आहेत.


कठीण आणि बिकट वाट असलेल्या किल्ल्यांमध्ये अलंग-मदन-कुलंग दुर्ग त्रिकुट ट्रेकिंग वर्तुळात अतिशय प्रसिद्ध असण्याचे कारण म्हणजे पर्वतारोहण (Mountaineering). पण पर्वतारोहण करताना तुम्हाला मूलभूत रॉक क्लाइंबिंगची साधने सुरक्षेची खात्री करण्यासाठी वापरावी लागतात. अलंगवर २५ आणि ५० फुटाचा रॉक पॅच आहे तर मदन वर ४० फुटांचा रॉक पॅच आहे. त्यामुळे हे किल्ले सर करण्यासाठी प्रस्तरारोहण तंत्राची (Climbing Techniques) व साहित्याची माहिती असणे आवश्यक आहे. या सोबत गर्द आणि वाट चुकवणारे रस्ते ही येथे आहेत. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे.


किल्ल्यावर जाणाऱ्या सोप्या वाटा आणि पायऱ्या ब्रिटिशांनी सुरुंग लावून नष्ट केल्या. गडावर जाणाऱ्या वाटा बिकट करणे, गडावरील पाण्याच्या टाक्यामधील झरे विझवणे असे प्रकार ब्रिटिश सत्तेने केले. त्यामुळे कधीकाळी वैभवसंपन्न अश्या राजवटीचे साक्षीदार असलेले अलंग मदन आणि कुलंग किल्ले आज मात्र सर करण्यास अतिशय कठीण आहेत.



घाटघर गावातून दिसणारे अलंग - मदन - कुलंग


पूर्वतयारी
स्वराजच्या वडिलांनी महाराष्ट्रातले बरेचशे ट्रेक्स केलेले होते. गेल्या काही वर्षात शुगरच्या तक्रारीमुळे त्यांनी trekking बंद केले होते. त्यांना खूप दिवसांची इच्छा होती AMK trek करायची. खूप दिवसांपासून आमचाही AMKचा trek pending होता. कारण हा trek तसा प्रकारचा असल्याने आणि पर्वतारोहण करावं लागणार असल्याने स्थानिक मदत घेण्यावाचून गत्यंतर न्हवते. मग अश्या वेळी मोठा ग्रुप असेल तर बरं राहत. शेवटी बऱ्याच मित्रांना विचारल्यानंतर ९ जणांचा ग्रुप तयार झाला.

ट्रेकची कठीणता जास्त असल्याने, मदतनीस असतानादेखील, स्वराजच्या वडिलांच्या सांगण्यावरून मी आणि स्वराजने फर्ग्युसन कॉलेजमागच्या टेकडीवर एक रॉक क्लाइंबिंगसाठी भिंत आहे, तिथे काकांच्याच मित्राकडून, जे स्वतः एक professional climber आहेत, क्लाम्बिंगच्या basic टिप्स घेतल्या आणि क्लाइंबिंगची तयारी केली.


त्या सरांनीच घाटघर गावच्या एकनाथचा contact दिला. एकनाथ आम्हाला पहिल्या दिवशीचा चहा-नाष्टा, संध्याकाळी चहा, रात्रीचं जेवण, दुसऱ्या दिवशीचा चहा-नाष्टा आणि दुपारच जेवण देणार होता. सोबतच अलंग गडावरून मदन गडाकडे जाताना लागणारे २ रॉक पॅच आणि मदन गडाचा रॉक पॅच चढायला उतरायला रॉक क्लाइंबिंगची साधने आणि मदत देणार होता. 


कित्येक trek करून माझे शूज पण फाटले होते. AMKच्या निमित्ताने मग Action चे चांगले trekking शूज घेतले. AMK नंतरच्या बऱ्याच trekमध्ये वापरूनसुद्धा अजून ते चांगले आहेत. स्वराजनेसुद्धा AMK trek च्या कारणाने ६० लिटर Haversack घेतली.

अलंग गड: (दिवस पहिला - सकाळ)
घाटघर गावातून घेतलेला सूर्योदयाचा फोटो
रात्रीचा प्रवास करून आम्ही घाटघर गावात पोहोचलो. फ्रेश होण्यासाठीची आणि सकाळच्या न्याहारीची सोय एकनाथने, आमचा पुढच्या दोन दिवसांसाठीचा स्थानिक मदतनीस आणि वाटाड्या, घाटघर गावात केली होती. सगळी आवरावर करून आम्ही पावणे आठच्या दरम्यान आमच्या गाडीच्या ड्रायव्हर काकांनाआणि घाटघर गावाला निरोप दिला. ड्रायव्हर काका आम्हाला आता दुसऱ्यादिवशी डोंगराच्या पलिकडे असलेल्या आंबेवाडी गावात भेटणार होते.⁣
आमचा पूर्ण ट्रेकचा route काहीसा वरप्रमाणे होता
ओढे, घनदाट जंगलं आणि ६-७ किलोमीटर चालून पार करून दिड तासांनंतर आम्ही पहिल्या पठारावर पोहोचलो. घनदाट जंगल आणि विरळ वस्तीमुळे हा मार्ग तसा कस पाहणारा आहे. तिथून पुढे धोकादायक निसरडं चढण, मोठमोठे दगड पार करत चढण केलं की एक २०-२५ फुटांचा लोखंडी जिना लागतो. तो पार केला की पहिला दरवाजा लागला. दरडी कोसळून तो आता पूर्णपणे बंद झालाय पण दरवाजाच्या डाव्या बाजूने भिंत चढून तो ओलांडला. पुढे सुरु होता १-२ किलोमीटरचा डोंगर कपारीतून जाणारा रस्ता. ही वाट म्हणजे एकावेळी एकच व्यक्ती जाईल अशी, काही ठिकाणी कातळामध्ये कोरलेल्या पायर्‍या तर काही ठिकाणी माती आणि छोटे खडक यामुळे निसरडा झालेला रस्ता. त्यावाटेच्या डाव्या बाजूला दरी आणि उजव्या बाजूस अलंगचा उंच काळा कातळ कडा आणि ती वाट पार करून आम्ही गडावरील गुहांजवळ आलो.⁣
किल्ल्यावर राहण्यायोग्य २ गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची राहण्याची सोय होते. आणि या गुहा डाव्याबाजूला ठेवून कोरलेल्या पायऱ्यांनी वर गेलात तर पाण्याची ११ टाक्या भेटतील. बऱ्याचश्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाहीये. थोडसं अजून पुढे गेलात की एका वाडयाचे काही अवशेष, एक छोटेसे मंदिर आहे. किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावरून आजुबाजूचा खूप मोठा परिसर दिसतो. दुपारचं जेवण आणि दुर्गभ्रमंती करून आम्ही मग मदनगडाच्या मार्गाला लागलो. या मार्गात आम्हाला ५० फूट आणि २५ फूटाचे २ कातळ रॅपलिंग करून उतरायचे होते.⁣ 
⁣आमच्या सोबतच्या अनुरागने Basic Mountaineeringचा course झालेला असल्यामुळे अलंगगडावरच्या ज्या ५० फुटी पॅचला उतरायला ३-४ मिनिटे लागली तो त्याने १७ सेकंदातच उतरला.



जर तुम्ही आंबेवाडी मार्गाने आलात तर किल्ला सर करण्यासाठी प्रस्तरारोहण तंत्राची व साहित्याची माहिती असणे आवश्यक आहे.⁣

२०-२५ फुटांचा लोखंडी जिना



दरडी कोसळून बंद झालेला दरवाजा


दरवाजा बंद असला तरी त्याच्या अलिकडून एक रस्ता बनवलाय दरवाजा पार करायला


दरवाजा पार केल्यावर गडमाथ्यापर्यंत काही ठिकाणी कातळात अश्या पायऱ्या खोदलेल्या आहेत


काही ठिकाणी वाट अशी धोकादायक झालेली आहे की एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकेल आणि डाव्या बाजूला लगेच दरी आहे 

मदन गड⁣⁣⁣⁣: (दिवस पहिला - दुपार अणि मुक्काम)
सह्याद्री मधील सर करायला कठीण अशा गडकिल्ल्यांमध्ये एक गड म्हणजे मदनगड किल्ला. गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे. तसा हा किल्ला बराच प्राचीन आहे आणि तेवढाच दुर्गम सुद्धा आहे. गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्ग अलंग आणि मदनच्या खिंडीतूनच जातात.⁣⁣
⁣⁣
अलंग गडाचे ५० फूट आणि २५ फूटाचे २ कातळ रॅपलिंग करून आम्ही उतरलो आणि मदन गडाच्या दिशेने चालू लागलो. सकाळी अलंग गड चढताना बराचसा भाग आम्ही ऊन चढायच्या आत पूर्ण केलेला आणि जेव्हा ऊन जाणवू लागलं तेव्हा आम्ही अलंगच्या डोंगर कपारीतून जाणाऱ्या वाटेला लागलेलो त्यामुळे आम्हाला ऊन फारसं काही लागलं नाही. आता मदनगडाला जातानापण डोंगर कपारीतून जाणाराच रस्ता असल्याने आणि सूर्य पश्चिमेकडे झुकल्याने थंडगार सावली होती. साधारण अर्धा तासाची पायपीट केल्यानंतर आम्ही अमंग-मदनच्या खिंडीत पोहोचलो. इथून एक वाट कुलंग गडाकडे जाते तर दुसरी मदन गडाकडे. मदनगडाच्या वाटेने थोडंस पुढं गेलं की कातळकोरीव सुंदर पायऱ्या सुरु होतात. थोड्याश्या लहान अश्या या पायऱ्या जपून चढाव्या लागतात कारण उजव्याबाजूला खोल दरी आहे. काही ठिकाणी या पायऱ्या इंग्रजांनी तोडलेल्या आहेत त्यामुळे अश्या ठिकाणी लाईफ लाईन (सुरक्षा दोरी) लावावी लागते आणि तिला नीट पकडूनच आपल्याला तो मार्ग पार करावा लागतो. पुढे मध्यावर कमी कठीण असा ४० ते ५० फुटी सरळ कातळकडा आहे. तो चढून वर आलं की इंग्रजांनी तोडून धोकादायक केलेल्या अजून काही पायऱ्या आम्हाला पार करायच्या होत्या. त्या चढून आम्ही गडमाथ्यावर पोहोचलो.⁣⁣
⁣⁣
गडमाथा तसा लहानच आहे. गडावर पाण्याच्या दोन टाक्या आहेत. त्यापैकी एका टाकीमध्ये उन्हाळ्यात पाणी मिळू शकते. गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा आहे. मुक्कामाला आम्ही त्याचं गुहेत झोपलो. सोबत काही उंदरंसुद्धा होते. रात्री अनुरागने त्याचे Mountaineering Courseचे अनुभव सांगितले तसेच Mountaineering knots आणि hitchesचं knowledge दिलं. गडावरून सभोवतालचा परिसर फारच छान दिसतो. मदनगडावरून अलंग, कुलंग, छोटा कुलंग, रतनगड, आजोबा गड, कात्राबाई, डांग्या सुळका, हरिहर, त्रिबंकगड हे किल्ले दिसतात.⁣⁣
अलंगच्या डोंगर कपारीतून जाणारी वाट

नीट निरखून पाहिलं तर समोरच्या कपारीत माझे काही मित्र दिसतील आणि तुम्हाला अलंग गडाच्या भव्यतेची कल्पना करता येईल तसेच आम्हाला किती चालावं लागलं ते समजेल


अलंग-मदनची खिंड, इथून डावीकडील रस्ता कुलंग गडाकडे तर उजवीकडील रस्ता मदन गडाकडे जातो


कातळातील कोरीव सुंदर पायऱ्या


काही ठिकाणी वाट अशी सुरुंग लावून फोडल्याने दोरी लावून काळजी घेत जावं लागतं


मदनगडावरून अलंगगड



मावळतीचा सूर्य मदनगडाच्या सर्वात उंच ठिकाणावरून


अनुराग त्याचं Mountaineeringचं  knowledge shareकरताना


कुलंग गड: (दिवस दूसरा)
अलंग किंवा मदनकडून कुलंगकडे जाणारी वाट मदनला वळसा मारून जाते. दरीच्या किनाऱ्यावरून चालत राहिलो. मध्येच एक घसरता उतार लागला दोरखंड लावून तो आम्ही पार केला. कुलंगगड अलंग मदन गडाप्रमाणे क्लाम्बिंग/रॅपलिंग करावं लागणारा अवघड गड नाहीये. इथे गडावर जायला पायऱ्या आहेत. दिड-दोन तासांच्या पायपिटीनंतर त्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलो. एव्हाना आठ वाजले होते आणि आता ऊन चटकायला लागलं होतं.⠀
गडाची तटबंदी अजुनही चांगल्या स्थितीत उभी आहे. दरवाजातून किल्ल्यावर पोहोचल्यावर एक वाट उजवीकडे वळते, गडाचा पश्चिम भाग. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर कातळ कड्यामध्येच २-३ गुहा आहेत. यापैकी सर्वात मधली गुहा मोठी असुन त्याला आत मध्ये दोन दालने आहेत. या गुहा मुक्कामासाठी योग्य आहेत ज्यामध्ये ३० ते ४० जण राहू शकतात. गुहे जवळच्या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर पाण्याच्या २-३ टाक्या लागतात. या टाक्या बर्‍यापैकी मोठ्या असून पूर्णपणे कातळात कोरलेल्या आहेत. या टाक्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांच्या जोताचे अवशेष पाहायला मिळतात.⠀
दरवाज्याच्या डाव्या वाटेने, मदन आणि अलंग कडील भाग, पुढे काही अंतर गेल्यावर ९ टाक्या आहेत जिथे भिंतीमध्ये गणपतीची भग्न मूर्ती आपल्याला दिसते. काही अंतर अजून चालत गेलं की गडावरील पुरातन बंधारा पाहायला मिळेल. ह्या बंधाऱ्याचा आकार मोठा असून येथे एक भग्न गोमुखही पाहण्यास मिळते. बंधाऱ्याच्या वरच्या भागात टाक्या खोदलेल्या आहेत. ह्या टाक्यातील पाणी तर शहरी पाण्यालाही लाजवेल इतकं गोड होतं. पाण्याने मनाची तृप्ती केली. अगदी पोट भरून पाणी प्यायलो आणि सोबतच्या बॉटल्सही भरून घेतल्या. अडीच-तीन तास गड भ्रमंती केली.⠀
वेळेचं भान ठेवून जे नियोजन केले होते त्यानुसार आम्ही संपूर्ण गड उतरून भंडारदरा-इगतपुरी डांबरी रस्त्यावर आमच्या ड्रायव्हर काकांना २-३ वाजेपर्यंत भेटणे अपेक्षित होते. गडाच्या पायऱ्या उतरल्यावर देखील त्या रस्त्यावर पोहोचायला भरपूर डोंगर उतरायचा होता. मग एकनाथ आणि teamला बाय-बाय करत पावणे बाराला गड उतरायला सुरुवात केली. नियोजनाप्रमाणे वेळेत आणि सुरक्षित trek पूर्ण केला. ड्रायव्हर काका वाट पाहतच होते. जवळच्या ओढ्यात हात पाय धुवून सगळे फ्रेश झालो आणि येताना जंगलात भेटलेला रानमेवा खिरन्या, बोरं इत्यादी खाण्यावर तुटून पडलो.
मदन अणि कुलंगच्या मध्ये लागलेला घसरता उतार


कुलंगच्या कातळात खोदलेल्या पायऱ्या


दरवाजाच्या उजव्या बाजूला असलेली गुहा


दरवाज्याच्या डावीकडील परिसर, जवळच कातळात खोदलेल्या ९ टाक्या दिसत आहेत


त्या ९ टाक्यांच्याच जागी दोन टाक्यांच्या मध्ये असलेली गणपतीची एक भग्न मूर्ती


गडावरील पडक्या वाड्याच्या जोताचे भग्नावशेष

Panoramic view

गडावरील पुरातन बंधारा


एकनाथ आणि त्याचे सोबती(गांधीटोपीवाले)

Pickup पॉइंटला पोहोचल्यावर काढलेला कुलंगगडाचा फोटो
आमचा संपूर्ण ग्रुप
centerला खाली बसलेलो मी आणि माझ्या उजव्या बाजूला गिरीश, आमच्या मागे उभे (माझ्या उजवीकडून डावीकडे) ड्रायव्हर काका, स्वराज, आदित्य, रिषभ, नीतीन, सम्राट आणि स्वराजचे वडील

आणि वरील ग्रुप फोटो काढणारा अनुराग


Comments