घनगड

घनगड trek

०५ नोव्हेंबर २०१७



बरेच दिवस झालेले गडवाटा धुंडाळल्या न्हवत्या आणि आठवडाभराच्या कामाच्या व्यापामुळे डोकंदेखील जाम झालेलं. स्वराजचाच मला फोन आला. शनिवारी किंवा रविवारी trek ला जाऊयात पण कुठे तरी नवीन ठिकाणी. मला देखील विचार करून गड ठरवायला सांगितलं. माझ्या डोक्यात सुधागड आला, मी केलेला नसल्यामुळे तिकोणापण आला. पण तिकोणा त्याने केला असल्यामुळे आणि सुधागडला जायचं तर ताम्हिणी घाट पूर्ण उतरून जावं लागणार म्हणून ते cancle झाले. त्यानेसुद्धा बरीच नावं सांगितली आणि बऱ्याच विचाराअंती घनगडला जायचं ठरलं. मार्ग मुळशीकडूनच होता पण आमच्यासाठी काहीसा नवा होता.

ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी ७:३०ला निघालो. Trek आधी मिसळ खाण्याची आमची प्रथा तर आहेच पण रविवार म्हटलं कि मिसळ ही पुण्याची सुद्धा एक प्रथा आहे. मग काय, प्रथेप्रमाणे पिरंगुटला श्रीपादची मिसळ खाल्ली आणि पुढच्या प्रवासाला लागलो.


ऊन होतं पण सहन होईल एवढं. मुळशी धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात शेतकरी रानात त्यांची शेतीची कामे करत होती. काही शेतातली कापणीची काम पूर्ण झालेली तर काही अजून चालू होती. काही १०-१५ माणसं भगवे झेंडे घेऊन रस्त्याने जाताना दिसली. बाकी सगळं निवांत होतं. शहरात असते तशी गरबड, लगबग, धावपळ न्हवती. सगळं कसं आपापल्या गतीनं धावत होतं. आमच्या प्रवासात सुद्धा असाच निवांतपणा होता. रस्ता बऱ्यापैकी मोकळाच असायचा, कधीतरी एखादी दुसरी गाडी दिसायची. अश्या शांततेमध्ये कसलाही मानसिक ताण असू द्या तो निघून जातोच आणि मेंदूला पुढच्या येणाऱ्या दिवसांसाठी, आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करून टाकतो.

भगवे झेंडे घेऊन जाणारी माणसं


भाताची कापणी

दिड तासाच्या प्रवासानंतर ताम्हिणी घाटाकडे जाणाऱ्या त्या रस्त्यावरून आम्ही कुंडलिका valley, अंधरबनकडे जाणाऱ्या हमरस्त्याकडे वळालो. हाच रस्ता पुढे पिंपरी, भांबुर्डे, सालथर खिंड, Aamby Valley मार्गे लोणावळ्याला जातो. सुरुवातीचा रस्ता खूप सुंदर आहे. दोन्ही बाजूने असलेल्या गर्द झाडीमुळे रस्त्यावर सूर्याची किरणेदेखील पोहोचत न्हवती. झाडांमुळे एक नैसर्गिक बोगदा तयार झालेला होता. पण असं फार तर फार पिंपरी गावापर्यंत होतं. त्यापुढे मोकळं माळरान होतं. एखादं दुसरं झाड रस्त्याच्या बाजूला असायचं. एव्हाना सूर्य डोक्यावर आला होता त्यामुळे सकाळी न जाणवणाऱ्या उन्हाच्या झळा आता जाणवू लागल्या होत्या. त्यात पिंपरी गावानंतरचा रस्ता खूपच खराब होता. इतका कि आम्हाला काळजी वाटू लागली की, आपण गडापर्यंत तर पोहोचू पण याच रस्त्याने परत जायचं म्हटलं तर गाडी खिळखिळी होऊन जाईल. घरी सुखरूप पोहोचू याची शाश्वती वाटत न्हवती. पण आता उपयोग न्हवता कारण रस्त्याच्या बाजूच्या दगडांवरून आणि पाट्यांवरून आम्ही गडाजवळ पोहचत आहोत असं दिसत होतं. मग आजुबाजूचा निसर्ग निहाळताना माझे दुरूनच गड शोधायचे खेळ सुरु झाले. पण इथे डोंगरांचे आकार असे होते कि त्या प्रत्येकाला मी गड समजत होतो.

झाडांमुळे तयार झालेला एक नैसर्गिक बोगदा

ठिकठिकाणी अशी रस्त्यांची चाळण झालेली होती

जवळपास पावणे बाराच्या सुमारास आम्ही भांबुर्डे गावाजवळ पोहोचलो. २०-३० घरं असलेलं हे छोटंसं गाव. इथूनच मग घनगडचं पहिलं दर्शन झालं. किल्ल्याच्या मध्यभागी आणि सर्वोच्च ठिकाणी असलेली तटबंदी भांबुर्डे गावातूनही स्पष्ट नजरेस येते. इथून २ किलोमीटरवर गडाच्या पायथ्याचं एकोले गाव. मग एकोले गावात आम्ही आमची गाडी लावली. आणि चौकशी करून निघालो. गड आमच्या डाव्या बाजूला ठेऊन आम्ही चालत होतो. पण चौकशीत सांगितल्याप्रमाणे डावीकडे वळणारा रस्ताच सापडत न्हवता. बरचसं चालल्यावर जाणवलं कि आपण चुकीच्या रस्त्याने चाललोय आणि आपण चालत चालत गडाला अर्धा वेढासुद्धा मारलाय. मग परत मागे फिरून गावात आलो आणि पुन्हा नीट चौकशी करून गावातल्या एक-दोन लहान मुलांना घेऊन बरोबर रस्त्याला लागलो.

भांबुर्डे गावातून दिसणारा घनगड

गारजाई देवीचं मंदिर

साधारण तासाभरात गडमाथा गाठता येतो. गावातून बाहेर पडल्यावर डावीकडची एक मळलेली पायवाट आपल्याला घनगडावर घेऊन जाते. त्या वाटेवर काही वेळ चालल्यावर दिसतं ते गारजाई देवीचं मंदिर. या मंदिरात “श्री गारजाई महाराजाची व किले घनगडाची” असा शिलालेख कोरलेला आहे. या पुरातन मंदिराची आता डागडुजी केल्यामुळे मुक्कामाला एक उत्तम जागा उपलब्ध आहे. मंदिराच्या समोरच एक तोफगोळा, एक दीपमाळ आणि काही वीरघळी आहेत. मंदिराच्या डाव्या हाताला असलेली एक छोटीशी पायवाट थेट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते. गडाच्या पहिल्या दरवाजाची कमान पूर्णपणे ढासळून गेली आहे. खडकातील खोदीव पायऱ्या चढून गडात प्रवेश करावा. प्रवेशद्वारापाशी असलेले दोन बुरुज बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. आत प्रवेश केल्यावर समोरच कड्याच्या कातळात खोदलेल्या दोन लेणी सदृश्य खोल्या नजरेस पडतात. उजव्या हातास थोडेसे अंतर चालल्यावर एका छोट्याश्या कपारीमध्ये देवीची सुंदर मूर्ती दिसते. इथून पुढे गड पाहण्यासाठी कोणताही मार्ग दिसत नाही. परत पहिल्याच ठिकाणी प्रवेशद्वारापाशी येऊन डाव्या बाजूचा रस्ता पकडला की शेवटची १५-२० मिनिटांची काहीशी अवघड चढण आहे. गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी इथे जवळपास १५ फूट उंचीचा एक सरळसोट कडा चढावा लागतो. गडावर जाणारी ही वाट इंग्रजांनी सुरुंग लावून चिणून काढली आहे. १५ फुटाच्या या कड्यावर थोडे प्रस्तरारोहण करून चढून जावं लागतं. एका दुर्ग संवर्धन संस्थेने १५ फुटी कड्यापाशी एक लोखंडी शिडी लावल्याने हि चढण जरा तरी सोपी झाली आहे. आधी तर इथे दोरी लावूनच कडा चढावं लागत होतं. तरीही खबरदारी बाळगावी. आणि आवश्यक असल्यास स्वतःला दोर लावा. पावसाळ्यात शिडी चढताना पाय सटकणार नाही याची काळजी घ्या. शिडीला धरून जाताना काही अंतरावर, केवळ पायाचा पंजा बसेल एवढीच जागा उपलब्ध आहे. डावीकडे थोडी खोल डोंगरकपार आणि उजवीकडे उभा डोंगर. तरी या एवढ्या चढणीमध्ये जरा खबरदार रहावे. कडा चढल्यावरदेखील केवळ एका बारीक केबलच्या आधाराने डोंगराच्या कड्याला वळसा मारावा लागतो. नंतर पुढे जाण्यासाठी डाव्या हाताला टेकडीवर जाणारी पायवाट पकडावी. या वाटेने वर जातांना एका पडक्या दरवाजातून आपण गडमाथ्यावर प्रवेश करतो.

हाच तो १५ फूट उंचीचा सरळसोट कडा

दुर्ग संवर्धन संस्थेने कड्यापाशी लावलेली लोखंडी शिडी

गडाच्या इतिहासाबद्दल
मुळशी धरणाच्या पश्चिमेला जो मावळ भाग आहे त्याला कोरस मावळ असं म्हणतात. इथून पूर्वी कोकणात उतरायला भोरप्याची नाळ, सवाष्णीचा घाट, वाघजाई घाट, नाणदाड घाट या घाटवाटा होत्या. या वाटांवर टेहळणी करायला आणि कोरस मावळच्या संरक्षणासाठी इथे काही किल्ल्यांची रचना करण्यात आली. त्यापैकी एक छोटासा किल्ला म्हणजे घनगड. घनगड किल्ला ३००० फूट उंचीचा असून तो गिरीदुर्गप्रकारातील आहे. आडबाजूला असलेला हा किल्ला मात्र trekkersला नेहमीच खुणावत राहतो. येथील जनजीवन शहरी सुखसोयीपासून दुरावलेलं आहे. किल्ल्याबद्दल इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. मराठी साम्राज्याच्या इतिहासातदेखील घनगड किल्ल्याचा उल्लेख फार तुरळक वेळा आढळतो. मात्र किल्ला कोळी सामंताकडून निजामशहाकडे आणि पुढे आदिलशहाकडे आणि नंतर मराठ्यांकडे आला. पुरंदरच्या लढाईमध्ये झालेल्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी मोघलांना दिलेल्या २३ किल्ल्यामध्ये घनगडाचा समावेश होता. पेशवेकाळात कान्होजी आंग्रेंकरवी घनगड शाहु राजांकडे शामील झाला. तेव्हा गडाचा कैदीखाना म्हणूनही वापर केला जात असे.

घनगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे
गडावर पडक्या घरांचे अवशेष आहेत. पाण्याच्या एक ते दोन टाक्या आहेत. आजमितिस मात्र त्या फुटलेल्या आहेत. बाकी किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत. पण किल्ल्यावरून सुधागड, सरसगड आणि तैलबैलाची भिंत हा परिसर दिसतो. तसेच नाणदांड घाट, भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा सुद्धा दिसतात.

गडावरून दिसणारा तैलबैलाचा कडा


आजूबाजूच्या परिसराचा Panoramic View, स्वराजच्या चेहऱ्याजवळ दिसणारा आहे तो सुधागड

गडावर राहण्याची सोय नाही मात्र गारजाई देवीच्या मंदिरात २० लोकांची राहण्याची सोय होउ शकते. जेवणाची सोय आपण स्वतः किंवा पायथ्याच्या गावात होऊ शकेल. किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही. किल्ल्यावर जाण्यासाठी सर्व ऋतु उत्तम आहेत.

गडावर पोहोचल्यावर आजूबाजूचा परिसर न्याहाळला, गड फिरलो, आसपासच्या परिसराचे तसेच आमचे स्वतःचे काही फोटो काढले आणि मग अर्ध्या तासाने गड उतरायला सुरुवात केली. अगदी १०-१५ मिनिटांत गड उतरलो. येतानाच्या प्रवासात रस्त्याची अवस्था समजली होती. त्यामुळे परत जाताना आता तो रस्ता न पकडता लोणावळ्याच्या बाजूने जाण्याचं आम्ही ठरवलं. येतानाच्या रस्त्यापेक्षा हा रस्ता काहीअंशी बरा होता पण शेवटी अॅम्बी व्हॅलीपर्यंत खराब रस्ता होताच. सालथर खिंडमार्गे अॅम्बी व्हॅलीकडे जाताना तैलबैलाच्या जवळून गेल्यामुळे तो पाहता आला. अर्धा-एक तासानंतर आम्ही चांगल्या रस्त्याला लागलो. एव्हाना ३:३० वाजून गेलेले, दुपारचं जेवणसुद्धा झालेलं न्हवतं त्यामुळे खूप भूक लागलेली. चांगला रस्ता सुरू झाल्यामुळे आता गाडी वेगात पळवायला सुरुवात केली होती. आणि तेवढ्यात एक दिड-दोन फुटाचा लांबलचक साप अचानक आमच्या गाडीला आडवा आला. गाडीला वेग असल्यामुळे स्वराजने वेग कमी करायचा प्रयत्न केला पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आणि आमची गाडी त्या सापावरून गेलीच. गाडी वेगात असल्यामुळे त्या ठिकाणच्या थोडं पुढे जाऊन हळू झाली. मग स्वराजने मला "गाडीखाली साप आलेला." असं सांगितलं. मला याबद्दल काहीच माहिती न्हवतं, मी घाबरलोच. मागे वळून पाहिलं पण साप काही दिसला नाही. माझ्या मनात शंका येऊ लागल्या, साप गाडीच्या चाकात अडकला नसेल ना वगैरे. पण तसं काही घडलं न्हवत. मग लोणावळ्याला न जाता आम्ही घुसळखांबवरून तुंग, जवन, पावना धरणमार्गे कामशेतला आलो. कामशेतला आल्यावर शांततेतून उठून गजबजाटात आल्याचं लगेच जाणवलं. तुंग, जवन, पावना धरणमार्गे येणं हा आमचा निर्णय चुकल्यासारखा वाटला कारण त्यामुळे आम्हाला खूप मोठा वळसा मारून यावं लागलं होतं. असो. पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांमुळे हायवेच्या एका हॉटेलमध्ये थांबून पोटभर जेवण केलं आणि रात्रीच्या ७:३० ला आम्ही सुखरूप घरी पोहोचलो.

Comments