मुकद्दर



चित्रपट, मालिका, कादंबऱ्या, कथा यांमधून दाखवलेला म्हातारा, धर्मवेडा, कोणाशीही सहज न बोलणारा औरंगजेब आणि त्याचे मूळ व्यक्तिमत्त्व ह्यात खूप फरक आहे. औरंगजेब केवळ आपल्याला प्रादेशिक पातळीवर चित्रपट आणि मालिकांच्या बजेटएवढाच किरकोळ दाखवला जातो. आपल्याला ठाऊक असलेला औरंगजेब फार मर्यादित आहे. आपल्याला माहीत आहे, आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराजांच्या समोर तख्त-ए-ताऊसवर बसलेला औरंगजेब ज्याने 'न भूतो न भविष्यति' असा आपला झालेला अपमान पचवला. संभाजी महाराजांचा क्रूर छळ करून त्यांची हत्या करणारा औरंगजेब आपल्याला माहीत आहे, पण आपल्याला तो औरंगजेब माहीत नाही, जो वयाच्या पस्तिसाव्या वर्षी बुऱ्हाणपुरात आपल्या मावशीकडे गेलेला असताना एका बाईच्या प्रेमात पडला होता. तिच्या इष्कात तो इतका बेभान झाला होता की, तिच्याखातर इस्लामच्या विरोधात जाऊन तो दारूही प्यायला सुद्धा तयार झाला होता. आपल्याला औरंगजेब ठाऊकच नाही, ज्याने तख्त मिळवण्यासाठी आपल्या सख्ख्या भावाना मारून टाकलं. तो औरंगजेब माहीत नाही ज्याने फितुरी करून आपल्या भावाला युद्धात मदत केली म्हणून सख्ख्या मुलाला आजन्म कारावासात ठेवलं. आपल्या सख्ख्या भावाला मारून त्याचे मुंडके नसलेल्या शरीराची संपूर्ण आग्रा शहरातून धिंड काढणारा औरंगजेब आपल्याला माहीत नाही. चौदा वर्षांचा असताना हत्तीसमोर निडर होऊन उभा राहणारा औरंगजेब आपल्याला माहीत नाही. खरं तर साठीच्या आतला औरंगजेब आपण आपल्या कल्पनेतही कधी आणला नाही.

स्वतःला नियती म्हणजेच मुकद्दर समजणारा हा सुलतान अखेर स्वतःचे मुकद्दर लिहू शकला नाही. दख्खनच्या पहाडांनीच त्याचं मुक़द्दर लिहिलं. महाराजांच्या निधनानंतर सुद्धा तब्बल २६ वर्षे मराठे तळहातावर शिर घेऊन ह्या क्रूर सुलतानाशी लढले. त्या पराक्रमाची याद म्हणजेच औरंगजेबाचे हे चरित्र…!

लाल किल्ल्यापासून राजगडपर्यंत आणि अफगाणिस्तानापासून सह्याद्रीपर्यंत अनेक चित्रे या पुस्तकात शब्दरूपात चितारली आहेत. आणि ती सर्व औरंगजेब या आकृती भोवती चितारली गेली आहेत. पण ते तुम्ही ठरवायचं, की औरंगजेब मध्यभागी आहे. की सगळ्या चित्रांमधली ती फक्त एक आकृती आहे.

बादशहा झाल्यानंतरची त्याची ही सगळ्यात मोठी पहिलीच मोहीम होती. त्यालाही वाटत असेल की, इतिहासात अजरामर व्हावे, पण चार लक्ष जनावरं आणि पाच लक्ष माणसं (त्यात जनानखाना आणि बाजारबुणगे सुद्धा आले) एवढी थोर आणि मातब्बर फौज तो ह्या डोंगदऱ्यांमध्ये घेऊन आला. मराठ्यांचं इवलंसं राज्य गिळायला एक वर्ष पुरेसे आहे, हा त्याचा समज होता. त्याचे सामर्थ्य पाहता हा समज खोटा होता, असेही म्हणता नाही येणार. पण एवढा बलवंत सुलतान असून देखील डोंगरदऱ्यांत चपळ चित्त्याप्रमाणे वावरणाऱ्या मूठभर मराठ्यांनी त्याला कसे नामोहरम केले, त्याचे परतीचे मार्ग कसे बंद केले, एका-एका किल्ल्याला जिंकण्यासाठी त्याला २-३ वर्ष झुंजावे लागे, त्यात पुन्हा पावसाळा सुरू झाला की मोहीम पुढचे ५-६ महिने तरी बंद आणि जिथे असेल तिथेच थांबणार, कित्येकदा मराठ्यांच्या छुप्या हल्ल्यात सैन्यासाठीची रसद मराठे कशी लुटून नेत प्रसंगी सैनिकांची कत्तल करत, ज्या तख्तासाठी तो निम्मी हयात झुंजला, ते तख्त त्याच्या दृष्टीपासून मराठ्यांनी कसे अदृश्य केले याची ही गाथा आहे.

औरंगजेबाची जी समवयस्क मंडळी होती ती ह्या लांबलेल्या मोहिमेमध्ये मेली. तरुण होती ती म्हातारी झाली, जी अगदीच लहान होती ती तरुण झाली ज्यांनी ह्या मोहिमेतच संसार थाटला. त्यांच्या मुलांना ठाऊक देखील नसेल की घर कशाला म्हणतात किंवा राहत घर कस असत. त्यांना हेही ठाऊक नसेल की आपली मातृभूमी ही दिल्ली, आग्रा, राजस्थान, काबूल वा लाहोर आहे. कदाचित ते फिरतीवरच्या तंबूलाच तेव्हा घर समजत असावेत. औरंगजेबाच्या सैन्याची अवस्था अशी का झाली असेल हे समजून घेण्यासाठी, दख्खन मोहिमेत मराठ्यांचं राज्य गिळायला निघालेल्या पण पहिला विजय पाहण्यासाठी आठ वर्ष वाट बघायला लागलेल्या आणि शेवटी स्वतः ची कबर इथेच खोदावी लागलेल्या या बादशहा बद्दल जाणून घेण्यासाठी, औरंगजेबाच्या स्वभावाची वेगवेगळी पैलू समजून घेण्यासाठी, औरंगजेबाच्या जीवनातील सर्वात मोठ्या अपयशाबद्दल जाणून घेण्यासाठी ही कादंबरी नक्की वाचा.

Comments