हिंदूत्व



रत्नागिरीला नजरकैदेत असतांना सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हा त्यांचा ग्रंथ लिहिला. तो १९२०च्या दशकात लिहिला गेलेला आहे, एवढे सांगितले म्हणजे देशातील त्यावेळच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीचे वेगळे वर्णन करायची आवश्यकता राहत नाही. हा मूळ ग्रंथ सावरकरांनी टोपण नावाने इंग्रजीत लिहिला व त्याचे मराठी भाषांतर नंतर झाले.

सावरकरांनी "हिंदूपण" किंवा "हिंदू असणे" याचे वर्णन करण्यासाठी "हिंदुत्व" हा शब्द वापरला. ‘हिंदुइझम’ (Hinduism) हा शब्द त्याआधी बर्‍याच काळापासून प्रचलित होता. पण तो न वापरता सावरकांनी हेतुत: ‘हिंदुत्व’ हा शब्द निर्माण केला. याचे कारण, ‘हिंदुइझम’ म्हटल्यावर त्या शब्दाचा अर्थ हिंदू धर्माशी जोडला जात असे, तसा तो अजूनही जोडला जातोच, पण सावरकरांना तो अर्थ अभिप्रेत नव्हता. जसे ममत्व, स्वत्व, मातृत्व, दातृत्व, उत्तरदायित्व, वगैरे तसे त्यांना अभिप्रेत होते ते ‘हिंदुत्व’. अर्थात्, हिंदुत्व म्हणजे ‘हिंदूपण’.

सावरकरांनी हिंदुत्वाला वांशिक, सांस्कृतिक आणि राजकीय ओळख मानली. सावरकारांची हिंदुत्वाची व्याख्या कुठल्याही प्रकारे धार्मिक नाही. याउलट ती भाषा, जाती, ‘मतें’ (जसें, बुद्धिझम, जैनिझम इ.) वगैरे सर्वांच्या पलिकडे आहे. हे सध्याच्या "हिंदू" शब्दाच्या वापरापेक्षा वेगळे आहे कारण त्यात फक्त हिंदू धर्मच नाही तर सर्व भारतीय धर्मांचा समावेश आहे. ती व्याख्या त्यांनी संस्कृतमध्ये केलेली आहे. काय आहे ही परिभाषा,

आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका।

पितृभूःपुण्यभूश्चैवस वै हिन्दुरितिस्मृतः॥

म्हणजे, सिंधूनदीपासून सिंधूसागरापर्यंत पसरलेल्या या भरतभूमीला जे लोक आपली समजतात, ज्यांचे पूर्वज या भरतभूमीत राहत होते, तसेच ज्यांच्या धर्माचा उगम या भूमीत झाला आहे आणि "ज्यांच्यासाठी भारतभूमी पितृभूमी आणि पवित्र भूमी आहे", ते सर्व लोक हिंदू आहेत.

सावरकर यांनी "हिंदू धर्म" या शब्दात सर्व भारतीय धर्मांचा समावेश केला आहे आणि संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेल्या "अखंड भारत" (अविभाजित भारत) या "हिंदू राष्ट्र"ची त्यांनी संकल्पना मांडली आहे.

मुळात 'हिंदुत्व' हा काही फक्त शब्द नाही, हा एक इतिहास आहे आणि हा इतिहासही, काही वेळेला काही लोक हिंदुत्व या शब्दांचा 'हिंदूधर्म' या सापेक्ष नावाशी घोटाळा करून केवळ धार्मिक आणि आत्मिक इतिहास समजतात तसा नाही तर हा इतिहास सर्वांगीण आहे. 'हिंदू धर्म' हा शब्द फक्त 'हिंदुत्व' यापासून उत्पन्न झालेला अंशात्मक एक देश दाखविणारा शब्द आहे. 'हिंदुत्व' या शब्दाचा अर्थ स्पष्ट केल्यावाचून 'हिंदूधर्म' याचा अर्थ अबोध्य व अनिश्चित राहतो. या दोन शब्दांमधील अंतर न समजल्यामुळे ह्या आपल्या हिंदू संस्कृतीचा अमूल्य ठेवा ज्यांच्या मालकीचा आहे, अशा सजातीय निरनिराळ्या जातीजातीमध्ये पुष्कळ गैरसमज व परस्पर अविश्वास उत्पन्न झालेला आहे.

या दोन शब्दांमधील अर्थामध्ये तत्त्वतः काय फरक आहे ते समजून घ्यायचं असेल तसेच सावरकरांची हिंदू आणि हिंदुत्वाची संकल्पना समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचालं पाहिजे.


Comments